विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी

नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा सुरू होण्याचा काळात उन्हाळ्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्याची विपरित परिस्थिती यावर्षी ओढवली आहे. दरवर्षीच्या तुलनेत आठवडाभराहून अधिककाळ उलटला तरी मान्सूनचा अद्याप थांगपत्ता नाही त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. महाराष्ट्रातील सर्वांधिक उष्णप्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूरमध्ये हवामानखात्याने आता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील नागपूर आणि विदर्भात सध्या कडक ऊन पडत आहे. हे भाग उष्णतेच्या तीव्र लाटेत आहेत. येथील तापमान ४३ ते ४४ अंशांवर जात आहे. नागपूर आणि विदर्भात पुढील तीन दिवसांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ सध्या भीषण उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. येथील तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त आहे. अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा येथे सर्वाधिक तापमान आहे. जूनमध्ये येथील तापमान ४३-४४ अंशांवर पोहोचते. हवामान खात्यानुसार यंदा मान्सून विदर्भात उशिराने दाखल होणार आहे. जूनच्या चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील तीन दिवस आणखी उष्मा राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने विदर्भातील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक एम.एल.साहू यांनी सांगितले की, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तीन दिवसांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या भयंकर उष्णतेचा प्रकोप आहे.यंदा मे महिन्यापेक्षा विपरित हवामान स्थिती जून महिन्यात अनुभवावी लागत आहे.
SL/KA/SL
17 June 2023