मुख्यमंत्री म्हणाले, फडणवीस आणि माझा फेविकॉल चा जोड
पालघर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती पंधरा वीस वर्षे जुनी आहे, कोणीही कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी ती तुटायची नाही अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली जोडी फेविकॉल का जोड आहे टुटेगा नही असे सांगत गेले दोन दिवस सुरू असलेल्या याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ते पालघर मध्ये सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते, हे दोन्ही नेते आज दोन दिवसात प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र दिसून आले.The Chief Minister said, Fadnavis and me added Fevicol
कोण्या एका जाहिरातीमुळे या सरकारला धोका निर्माण होईल असे हे तकलादू सरकार नाही अशी ग्वाही याआधी फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिली होती. आमच्या दोस्तीत कोणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी तो टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र तो खडा आम्ही उचलून बाहेर टाकला असे शिंदे यावेळी म्हणाले. आमची युती सत्तेसाठी नाही तर वैचारिक आहे. गेल्या वर्षभरापासून आमचे नाते घट्ट झालेले आहे, कोण्या एका जाहिरातीने ही मैत्री तुटणार नाही असे फडणवीसांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
आम्ही वेगळे होऊ अशी संधी पाहणाऱ्या लोकांनी तो विचार काढून टाकावा , यापूर्वी कोणी आधी भाषण करायचे आणि कोणी नंतर यावरून भांडणे होत होती , मात्र आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही आम्ही या उपक्रमातून लोकांच्या दारी आलो आहोत असेही फडणवीस म्हणाले. दोन दिवसांपूर्वी प्रसिध्द झालेल्या एका जाहिराती वरून उडालेला राजकीय धुरळा खाली बसवण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र पालघरला एकाच हेलिकॉप्टर ने गेले मात्र तिथून कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी त्यांनी वेगवेगळी वाहने वापरल्याचे दिसून आले.
राज्यात सगळ्यात लोकप्रिय कोण आहे हे दर्शाविण्याच्या नादात शिवसेना पक्षाकडून दिलेल्या जाहिरातीतील चूक निस्तरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. तिकडे दोन दिवस नाराजी व्यक्त करणारी भाजपाची मंडळी आजच्या फडणवीसांच्या वक्तव्याने आपली नाराजी दूर करून एकत्र नांदतील का ते पहायचे , या सगळ्यात सर्व सामान्य जनतेच्या हाती काय पडले ते मात्र शोधावेच लागेल.
ML/KA/PGB
15 Jun 2023