महाराष्ट्रात ५ ठिकाणी वर्षभरात उभारली जातेय शिवसृष्टी…

 महाराष्ट्रात ५ ठिकाणी वर्षभरात उभारली जातेय शिवसृष्टी…

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलडाणा, संभाजीनगर, नाशिक आणि रामटेक या पाच ठिकाणी शिवसृष्टी उद्यान, संग्रहालय तसेच शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येणार आहे.

या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून येत्या वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो. ही बाब लक्षात घेवून छत्रपती शिवरायांचा इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून दिली जाणार आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यासाठी ७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचही मंत्री लोढा यांनी सांगितलं.

मुंबईतील गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. येथील २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य आणि आरमारासंदर्भातील युद्ध संग्रहालय उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, छत्रपती संभाजी नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय तर रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आल्याचही त्यांनी सांगितले.

या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येणार असल्याचे ते म्हणाले.

यासोबतच भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क साठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तां करीता ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा येथे निवास व्यवस्था उभारण्यासाठी ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.

ML/KA/SL

14 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *