लोकप्रियतेच्या जाहिरातीवर नवीन जाहिरातीचा उतारा

मुंबई, दि. १४(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे दर्शविणाऱ्या जाहिरातीवर काल प्रचंड राजकीय वादळ निर्माण झाल्यानंतर आज त्यावर उतारा म्हणून नवीन जाहिरात शिवसेनेने प्रसिध्द केली आहे.
काल शिवसेनेने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय तर राज्यात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे म्हटले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचेही त्यात दिलेल्या लोकप्रियतेच्या टक्केवारीत स्पष्ट दिसत होते. याखेरीज शिवसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रच नव्हते यामुळे ही जाहिरात चांगलीच वादग्रस्त आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी ठरली होती.
आज यावर उतारा म्हणून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात काल नसलेली बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे आज दिसत असून त्यात जास्त लोकप्रिय कोण याचा उल्लेख टाळला आहे. मात्र ‘ बूँद से गयी वो हौद से नहीं आती ‘ अशीच प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.
काल जाहिरात प्रसिद्ध होताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून तीव्र नाराजी दर्शविणाऱ्या प्रतिक्रिया आल्या होत्या तर संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडल्याची कडवट टीका करण्यात आली होती. विरोधकांनी यावरून शिंदे गटाला धारेवर धरले होते तर भाजपा कडून ही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या नंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात या विषयावर उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
त्यामुळे आज पुन्हा एकदा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून झालेले राजकीय नुकसान दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. कालपासून कुठल्याही दौऱ्यात सहभागी न झालेल्या फडणवीस यांनी पुढचे दोन दिवसातले दौरे ही रद्द केले असून केवळ मुंबईतच बैठकांमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले आहे, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करीत असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी खरे दुखणे वेगळेच तर नाही ना याची शंका व्यक्त केली जात आहे.
SL/KA/SL
14 June 2023