औरंगजेब स्टेटस प्रकरणी कोल्हापुरात मोठा तणाव

कोल्हापूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औरंगजेबाचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात त्यांनी आज बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले आहेत.
औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांना तातडीनं अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी
संघटनांनी केली आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.यावेळी घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला.
शहरात सर्वत्र प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व भागातील दुकाने, रिक्षा हॉटेल्स, टपऱ्या, कोल्हापूर महानगरपालिका परिवहन बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीमुळे शिवाजी चौक महापालिका परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यातच या ठिकाणी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.Big tension in Kolhapur over Aurangzeb status
छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते याच्यामध्ये बाचाबाची झाली.यादरम्यान पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यावेळी जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली.
यावेळी महापालिका चौक, शिवाजी चौक या रोडवर प्रचंड धावपळ झाली.
पार्श्वभूमी काय
औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या. पोस्ट व्हायरल करणाऱ्यांच्या घरावर चाल करून प्रक्षुब्ध जमावाने सिद्धार्थनगर व दसरा चौक येथील प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. लक्ष्मीपुरीतील बाजारपेठ, दुकाने, स्टॉल तसेच सीपीआर चौक परिसरातील हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली.शहरात दिवसभर प्रचंड तणाव होता. पोलिसांनी जमावावर लाठीहल्ला केल्याने संतापाची लाट उसळली.या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आज
कोल्हापूर बंदची (Kolhapur bandh) हाक दिली आहे. सकाळी छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित जमण्याचे आवाहन या संघटनांनी केले होते,
औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते. सुमारे दीड हजाराहून अधिक प्रक्षुब्ध कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर दिवसभर ठाण मांडून रास्ता रोको केला. कार्यकर्त्यांनी सीपीआर चौक, दसरा चौक आणि लक्ष्मीपुरीसह विविध ठिकाणी घोषणाबाजी करून समाजकंटकांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी परिसरातील तणावपूर्ण स्थितीमुळे अकबर मोहल्ला, सदर बाजार महाराणा प्रताप चौक, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसरात पडसाद उमटले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. ठिकठिकाणी पोलिसांनी केलेला लाठीहल्ला आणि दगडफेकीत दोन तरुण जखमी झाले आहेत. शहरातील विविध भागात रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गस्त सुरू होती.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल होत असल्याने लक्ष्मीपुरी, शाहूपुरीसह काही भागात तणाव होता. मात्र सोमवारी रात्री उशिरा काही समाजकंटकांनी मोबाईलवर औरंगजेबाच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक बनले. सदर बाजार येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यामुळे बजरंग
दलाचे शहर प्रमुख पराग फडणवीस, ओंकार शिंदे, सुमितपवार, दिलीप वाळा, प्रथमेश मेठे यांच्यासह शेकडो संतप्त कार्यकर्त्यांनी सकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची भेट घेऊन समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केली.
ML/KA/PGB
7 Jun 2023