बिपरजॉय’ चक्रीवादळ कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता!

 बिपरजॉय’ चक्रीवादळ  कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता!

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा, तर काही भागांत वादळी पावसाचे तडाखे अशी स्थिती असताना आता राज्यावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या 24 ते 48 तासांत या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.या संभाव्य वादळाचा फटका राज्याला बसणार असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळू शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे.अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील 24 ते 48 तासांत उत्तरेकडे सरकण्याचा आणि त्यामुळे अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रीवादळात रुपांतर होऊन 8 ते 9 जूनदरम्यान हे चक्रीवादळ अधिक तीव्र होऊ शकते. यावेळी समुद्र खवळलेला असेल आणि वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी इतका असू शकेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या नव्याने तयार होणाऱ्या चक्रीवादळाचे नाव ‘बिपरजॉय’ असेल. बांगलादेशने हे नाव दिले आहे.कोकणसह, मुंबई, पालघर आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा फटका बसण्याची भीती आहे. या सर्व भागांत यादरम्यान मुसळधार पाऊस पडणार असून ,सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका मच्छीमारांना बसणार असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

ML/KA/PGB 6 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *