राज्यभरात जोरदार वारे आणि वळीवाच्या सरी…
धुळे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धुळ्यात वळीवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली तर धुळे शहरासह साक्री तालुका पिंपळनेर माळमाथा परिसरात आज पावसाचे जोरदार वाऱ्यासह आगमन झाले. धुळे शहरात जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह दुपारी पाऊस झाला.
शिंदखेडा तालुक्यात देखील वारा व काही प्रमाणात पाऊस झाला अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली त्यामुळे नुकसान झाले आहे
पुणे — पुणे शहरात आज दुपारनंतर शहराच्या विविध भागात पाऊस झाला. शिवाजीनगर बंड गार्डन, कोरेगाव पार्क हडपसर भेकराई नगर ,रेसकोर्स भागात जोरदार पाऊस झाला.
जालना– जालना शहरात तुफान वादळवारा.शहरासह परिसरात कोसळल्या पावसाच्या हलक्या सरी, नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला.
वादळी वाऱ्याने जालना शहरासह परिसरात धुमाकूळ घातला असून अचानक आलेल्या वादळामुळे भीतीपोटी नागरिकांची तारांबळ उडाली. वादळ इतकं भयंकर होतं कि समोरचं काही दिसत नव्हतं. शेतामध्ये शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली .
दरम्यान हा वादळी वारा मंठा तालुक्यात सुद्धा दिसून आला, मंठा तालुक्यातील देवगाव खवणे या ठिकाणीही जोरदार वादळी वारा वाहत होता, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट दिसत होते, या सोबतच शहरासह परीसरात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
यवतमाळ- –
यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.
अहमदनगर – –
जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात अनेक ठिकाणी वादळाने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी विद्युत खांबही पडले. त्यामुळे अनेक रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अनेक घरावरील पत्रे तसेच पत्र्याचे शेड उडून गेले. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.