भारताने जिंकली ज्युनियर आशिया हॉकी चॅम्पियनशिप
ओमान,दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानला पराभूत करून भारतीय ज्युनिअर हॉकी संघ ज्युनियर आशिया कप चॅम्पियन बनला. ओमानमधील सलालाह येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारताने चौथ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. यासह भारतीय संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला.ज्युनियर आशिया चषकाचा हा नववा सिझन होता. भारतीय संघ सहाव्यांदा स्पर्धेचा अंतिम सामना खेळत होता. विजेतेपदाच्या लढतीत भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र संघाला गोल करता आला नाही.
सामन्याच्या १३व्या मिनिटाला अंगद बीर सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. 15व्या मिनिटाला पाकिस्तानला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताने एकही गोल होऊ दिला नाही. सामन्याच्या 20व्या मिनिटाला अरिजितसिंग हुंदलने आघाडी दुप्पट केली. यानंतर पूर्वार्धात एकही गोल झाला नाही.
पाकिस्तानच्या बशारत अलीने सामन्याच्या 38व्या मिनिटाला गोल करून आघाडी कमी केली. त्यानंतर दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत आणि सामना भारताच्या बाजूने 2-1 असा संपला. भारताने या स्पर्धेत एकूण 50 गोल केले आणि सर्वाधिक गोल करणारा संघ ठरला.
हॉकी इंडियाच्या कार्यकारी मंडळाने खेळाडूंना 2 लाख आणि सपोर्ट स्टाफसाठी 1 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले. संघाचे अभिनंदन करताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री दिलीप टिर्की म्हणाले, “भारतीय ज्युनियर पुरुष संघाने ज्युनियर आशिया चषकात आपल्या नाबाद कामगिरीने आम्हा सर्वांना अभिमान वाटला आहे. सुलतान ऑफ जोहोर चषकात ऐतिहासिक विजयासह त्यांचे वर्चस्व कायम राहो. “आणि मला खात्री आहे की हा मोठा विजय त्यांना या वर्षाच्या अखेरीस ज्युनियर विश्वचषकासाठी चांगल्या स्थितीत ठेवेल.”
SL/KA/SL
2 June 2023