भंडारदरा मधील पांजरे गावात होतोय काजवा महोत्सव

 भंडारदरा मधील पांजरे गावात होतोय काजवा महोत्सव

अहमदनगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने ३ व ४ जून २०२३ रोजी भंडारदरा येथील पांजरे गावामध्ये काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी. असे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई – राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

काजवा महोत्सवामध्ये येणाऱ्या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकांसोबत काजवे पाहण्याची संधी मिळणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आनंद घेता येणार आहे. जे पर्यटक भंडारदरा येथे मुक्काम करू इच्छितात त्यांचेसाठी सशुल्क टेंट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. टेंट व गाईड या संदर्भात अधिक माहितीसाठी ९१७५०९४५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

तसेच या महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येणार आहे. या मध्ये भंडारदरा परिसरामध्ये विशेष करुन घेतल्या जाणाऱ्या काळा भात व विविध भरड धन्य यांची विक्री तसेच त्यापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ देखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांनी बनवलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

काजवे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपली वाहने वाहनतळावर लावावीत व तेथून चालत जाऊन काजवे पाहावेत. झाडांच्या जवळ वाहने लाऊ नये. काजवे पाहतांना बॅटरीचा वापर फक्त रस्ता पाहण्यासाठी करावा. झाडावर बॅटरीचा प्रकाशझोत फिरवू नये. काजवे पाहतांना मोबाईल अथवा कॅमेराचा फ्लॅश चमकवू नये. तसेच गाडीच्या लाईटचा प्रखर प्रकाशझोत काजवा असलेल्या झाडावर टाकू नये.

काजवे असलेल्या झाडांपासून किमान ५० फूट अंतर राखावे. गोंगाटामुळे काजवे उडून जाण्याची शक्यता असल्याने परिसरात मोठ्याने आवाज करु नये, गाणी लावू नयेत, तसेच गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजवू नये. काजवा हा अतिशय संवेदनशील कीटक असल्याने आणि मे , जून हा काजव्याचा प्रजनन काळ असल्यामुळे, येणाऱ्या पर्यटकांनी अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचा काजव्यांवर विपरीत परिणाम होऊन काजव्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याचा धोका संभवतो.अशी पथ्ये काजवे पाहतांना पर्यटकांनी बाळगणे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ८००७१२०८३२ या भम्रणध्वनीवर संपर्क साधावा.

ML/KA/PGB
1 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *