राज्याच्या सातही विभागांमध्ये ‘एनडीआरएफ दल तैनात
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करा तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीत राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा खर्च, कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे, कोविड व विविध प्रसंगी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा खर्च, ई पंचनामे, आपदा मित्र, ई सचेत प्रणाली आदि मुद्द्यांवर मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सादरीकरण केले.