स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे मानवरूपी कल्पवृक्ष
मॉरिशस, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “स्वातंत्र्यवीर सावरकर हे मानवरूपी कल्पवृक्ष होते. ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळ, मुळं उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते; त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, व्हिजनरी असे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवणे हे आपली जबाबदारी आहे”, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मॉरिशस येथे केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजन करण्यात आले आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वा. सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. मॉरिशसचे माननीय राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
“मॉरिशस आणि महाराष्ट्राचे भावबंध हिंदी महासागराएवढे गहिरे आणि विशाल आहेत. मॉरिशसच्या मराठी बंधू भगिनींनी २०० वर्ष आपली हिंदू संस्कृती जपली आहे. या देशात मराठी भाषा वाढविण्याचे आणि संवर्धन करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इथल्या सरकारच्या विविध मंत्रालयांना भेटी देत असताना २०१४ नंतर मोदीजींनी मॉरिशसला विशेष मित्रराष्ट्राचा दर्जा दिल्याने भारताचे आणि मॉरीशसचे भावबंध अजून घट्ट झाल्याचं जाणवलं.” असेही यावेळी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ऋणानुबंध वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यातूनच वीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्रातर्फे आम्ही आज भेट दिला आहे. वीर सावरकरांच्या विचारांची ऊर्जा मॉरिशसच्या समस्त हिंदू आणि मराठी बांधवांना मिळत राहील.” असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
“अटल बिहारी वाजपेयी आणि मोरेश्वर यांचेही एक अतूट नाते होते. डिजिटल क्रांती झाली त्या डिजिटल क्रांतीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान होते. सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. अंदमानच्या कारावासातही सावरकर यांनी आपले अजरामर काव्य रचले. अंदमानमधील सेल्युलर जेलमधील भिंतीवर कोरलेले सावरकरांचे राष्ट्रभक्तीपर काव्य आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे.” असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
“भारत आणि मॉरिशस राष्ट्र या दोन्ही देशांचे संबंध अतिशय वृद्धिंगत होताना दिसत आहेत. विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने भारत आणि मॉरिशस हे दोन्ही विकासाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक रित्या पुढे जात आहेत मॉरिशस मधील सांस्कृतिक चळवळ ही वृद्धिंगत होताना दिसत आहे” असेही गौरवोद्गार मंत्री चव्हाण यांनी यावेळी काढले.
या प्रसंगी मॉरिशस हाऊसिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद बब्बीआ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आणि मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे मुख्य निर्माते अर्जुन पुतलाजी, मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितिन बाप्पू, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे अध्यक्ष आणि सीएसके असंत गोविंद, खासदार अॅश्ले इट्टू, कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय वारसा निधी संचालक शिवाजी दौलतराव, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे सरचिटणीस बाबुराम देवरा, क्रॉसवेज इंटरनॅशनल, मॉरिशसचे व्यस्थापकीय संचालक दिलीप ठाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
ML/KA/SL
28 May 2023