मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रकल्प कार्यरत

 मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी  प्रकल्प कार्यरत

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ज्या मिठी नदीमध्ये अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत मासे दिसणे ही एक दुर्मिळ बाब मानली जात होती. त्याच मिठी नदीत काही ठिकाणी आज थोड्याफार प्रमाणात का होईना, मासे दिसू लागले आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक बदल प्रत्यक्षात आणणा-या ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील काही लाख लिटर पाण्याची गुणवत्ता वृद्धिंगत करुन ते पाणी पुन्हा मिठी नदी मध्ये सोडण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे प्रकल्प परिसरातील नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचे निदर्शनास येत असून यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न योग्य दिशेने असल्याचे अधोरेखित होत आहे.मुंबई नगरीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असणारी व मुंबईची ओळख मानली जाणारी मिठी नदी. मुंबईतच उगम पावणा-या आणि मुंबईतच समुद्राला जाऊन मिळणा-या या मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर एवढी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र (Catchment Area) हे साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणा-या विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीचा प्रमुख जलस्रोत आहे. ही नदी माहिमच्या खाडीतून समुद्राला जाऊन मिळते.मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजीच्या प्रलयकारी पावसानंतर पुरपरिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची (एम. आर. डी. पी. ए.) १९ ऑगस्ट २००५ रोजी स्थापना करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सी. डब्ल्यू. पी. आर. एस.) आणि सत्यशोधन समितीच्या शिफारसींनुसार, दोन टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत व सेवा रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यातील बहुतांश कामे आता पूर्ण झाली आहेत.कधी एकेकाळी वाहती आणि समृद्ध नदी म्हणून ओळख असणारी ही मिठी कालांतराने घनकचरा, सांडपाणी, अतिक्रमण आदी समस्यांनी ग्रासली गेली आणि या नदीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सफेद पूल नाला, मरोळ बापट नाला आणि वाकोला नाला; असे नाले या मिठी नदीलाच येऊन मिळतात. त्यामुळे ही नदी एका मोठ्या नाल्याप्रमाणेच भासत होती. परंतु, या मिठीला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.’मिठी नदी विकास आणि प्रदुषण नियंत्रण प्रकल्प’ या अंतर्गत सध्या मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पवई भागात दररोज ८० लाख लिटर क्षमतेचा जल गुणवत्ता सुधारणा प्रकल्प जानेवारी २०२३ पासून अव्याहतपणे कार्यरत आहे. या प्रकल्पाद्वारे गुणवत्ता सुधारणा करण्यात आलेले अर्थात शुद्धीकरण केलेले पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मिठी नदीतील पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासह नदीतील जैवविविधता अबाधित राखण्यास व जैवविविधतेची वृद्धी होण्यास मदत होत आहे.विविध भागातील घाण, कचरा तसेच सांडपाणी मिठी नदीमध्ये येत असल्याने या नदीचे पाणी खूप दूषित होत होते‌. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने नदीपात्राची खोलीही कमी झाली होती. शिवाय, नदीच्या तटवर्ती भागात उद्भवलेल्या अतिक्रमणांमुळे नदीपात्राची रुंदीही कमी झाली होती. या सर्व बाबींचा प्रतिकूल परिणाम मिठी नदीमध्ये असलेल्या जैवविविधतेवर झाला होता. त्यामुळे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे जानेवारी २०२३ मध्ये पवई येथे ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधारणा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत बिनपावसाळी पाणी अडवणे, सांडपाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि पाण्यास वापरायोग्य बनवणे या प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेतून शुद्ध केलेले पाणी पुन्हा मिठी नदीत सोडले जाते. *अशी होते सांडपाण्यावर प्रक्रिया*👇मिठी नदीशी संलग्नित असलेल्या एका वाहिनीच्या ‘रोबोहोल’मधून हायड्रोलिक आणि गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पाणी प्रकल्प स्थळाकडे नेले जाते. यासाठी सुमारे ५९ ‘रोबोहोल’ (पूर्वीचा शब्द ‘मॅनहोल’) एकमेकांशी जोडले आहेत. प्रकल्पापर्यंत आणलेल्या पाण्यावर प्राथमिक, द्वितियक आणि तृतियक अशा तीन स्तरीय प्रक्रिया होतात. प्राथमिक प्रक्रियेत सांडपाण्यासोबत आलेला कचरा वेगळा केला जातो. द्वितीयक प्रक्रियेत पाण्यातील धातू किंवा अन्य प्रकारचे सूक्ष्म कण वेगळे केले जाते. तृतियक प्रक्रियेत पाण्यातील दुषितपणा आणि दुर्गंधी दूर केली जाते. त्यानंतर अतिनील किरणांच्या मदतीने शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाते. हे शुद्ध झालेले पाणी पुन्हा मिठी नदीत सोडले जाते. *पाण्याचे शुद्धीकरण, मासे आणि अन्य सजीवांना अभय*👇’मिठी नदी जल गुणवत्ता सुधारणा’ प्रकल्प हा पवई क्षेत्रात कार्यरत आहे. यामध्ये फिल्टरपाडाचा परिसर, मोरारजी नगर आणि मिठी नदीचा भाग येतो. या भागातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून या प्रकल्पामध्ये पाणी शुद्ध करुन ते पुन्हा मिठी नदीमध्ये सोडले जाते. यावर्षीच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे पवई परिसरातील प्रकल्प स्थळाजवळ थोड्याफार प्रमाणात का होईना, पण पुन्हा एकदा मासे दिसू लागले आहेत. मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यान्वित केलेला हा प्रकल्प येथील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठीही तितकाच फायदेशीर ठरत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

ML/KA/PGB 28 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *