अंध पाहू शकतील, अर्धांगवायूग्रस्तांचे आयुष्य सुसह्य होईल असे अत्याधुनिक संशोधन
टेक्सास, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क आता मानवी आयुष्य अधिकाधीक सुसह्य करून शारीरिक अपंगत्व आलेल्यांचे आयुष्य सुकर करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांच्या ब्रेन-चिप कंपनीला न्यूरालिंकला मानवी चाचण्यांसाठी यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) कडून मंजुरी मिळाली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास अंधांनाही चिपद्वारे पाहता येणार आहे. अर्धांगवायूचा त्रास असलेले रुग्ण विचार करू शकतील आणि मोबाइल-संगणक ऑपरेट करू शकतील. त्याबद्दल मस्क यांनी न्यूरालिंक टीमचे अभिनंदन केले आहे.
मस्क यांनी ६ वर्षांपूर्वी ब्रेन कंट्रोल इंटरफेस स्टार्टअपची स्थापना केली आणि २ वर्षांपूर्वी त्यांचा इम्प्लांटेशन रोबोट दाखवला. त्याचवेळी, मस्क यांनी 6 महिन्यांपूर्वी न्यूरालिंकच्या कॅलिफोर्निया मुख्यालयात झालेल्या ‘शो अँड टेल’ कार्यक्रमात आपल्या उपकरणाच्या प्रगतीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ब्रेन चिप इंटरफेस स्टार्टअपचे विकसित वायरलेस डिव्हाइस 6 महिन्यांत मानवी चाचणीसाठी तयार होईल. यासाठी एफडीएकडे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.
न्यूरालिंकने ट्विटरवर लिहिले, ‘आम्ही हे सांगण्यास उत्सुक आहोत की आमचा पहिला मानवी क्लिनिकल अभ्यास सुरू करण्यासाठी आम्हाला FDA ची मंजुरी मिळाली आहे. FDA च्या जवळच्या सहकार्याने Neuralink टीमच्या अविश्वसनीय कार्याचा हा परिणाम आहे. एक दिवस आमचे तंत्रज्ञान अनेकांना मदत करेल. आमच्या क्लिनिकल चाचणीसाठी भरती अद्याप उघडलेली नाही. याबाबत लवकरच माहिती देऊ.
न्यूरालिंकने नाण्यांच्या आकाराचे उपकरण तयार केले आहे. त्याला लिंक असे नाव देण्यात आले आहे. हे उपकरण संगणक, मोबाइल फोन किंवा इतर कोणतेही उपकरण थेट मेंदूच्या क्रिया (न्यूरल इम्पल्स) द्वारे नियंत्रित करण्यास सक्षम करते. उदाहरणार्थ, अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर तो फक्त विचार करून माउसचा कर्सर हलवू शकेल.
न्यूरालिंकने म्हटले की, आमच्या तंत्रज्ञानाचे प्रारंभिक उद्दिष्ट अर्धांगवायू झालेल्या लोकांना संगणक आणि मोबाइल उपकरणांवर नियंत्रण देणे आहे. आम्हाला त्यांना स्वतंत्र करायचे आहे. एक दिवस अशी माणसे फोटोग्राफीसारखी सर्जनशीलता आमच्या उपकरणाद्वारे दाखवू शकतील, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला विश्वास आहे की या तंत्रज्ञानामध्ये अनेक न्यूरोलॉजिकल विकारांवर उपचार करण्याची क्षमता आहे.
SL/KA/SL
26 May 2023