चित्त्यांची पिल्लेही दगावली
भोपाळ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रीकेतून आणलेल्या चित्त्यांवरील अरिष्ट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. महिन्याभरात दोन चित्त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर आता चित्यांची नवजात पिल्ले दगावण्याची गंभीर घटना घडली आहे. आज कुनोमधील मादी चित्ता ज्वालाच्या दोन पिल्लांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मोठा गाजावाजा करत आणलेल्या चित्त्यांसाठी आपल्या इथले वातावरण जगण्यासाठी सुसह्य आहे का? या बाबत पर्यावरण प्रेमींनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
याआधी मंगळवारीही एका पिल्लाने जीव गमावला होता. ज्वालाच्या चारपैकी तीन पिल्लांचा मृत्यू झाला आहे. एक पिल्लू जिवंत असलं तरी त्याची प्रकृती गंभीर आहे. या पिल्लाला पालूपर चिकित्सालयात ठेवण्यात आलं आहे. मागच्या दोन महिन्यांमध्ये 6 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता ज्वालाने 27 मार्चला 4 पिल्लांना जन्म दिला होता, पण या पिल्लांना उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन झालं. प्रमुख वन संरक्षक जेएस चौहान यांनी पिल्लांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. पिल्लांच्या प्रकृतीकडे आम्ही लक्ष देत आहोत, पण दिवसाचं तापमान 46 ते 47 डिग्री सेल्सियसपर्यंत जात आहे, त्यामुळे या पिल्लांना त्रास होत आहे, असं वन संरक्षक म्हणाले.
भारतामध्ये चित्ते 70 वर्षांपूर्वी विलुप्त झाले, यानंत चित्ता प्रोजेक्ट अंतर्गत नामिबियामधून 8 चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन चित्ते जंगलामध्ये सोडले, यानंतर 18 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते कुनोमध्ये आणले गेले. चार पिल्लांच्या जन्मानंतर चित्त्यांची संख्या 24 झाली होती. पिलांच्या जन्माआधी मादी चित्ता साशाचा मृत्यू झाला, यानंतर काहीच दिवसांमध्ये उदय आणि दक्षा या दोन चित्त्यांनीही जीव गमावला. आता तीन पिल्ल्यांच्या मृत्यूनंतर चित्त्यांची संख्या 18 राहिली आहे.
SL/KA/SL
25 May 2023