या देशाच्या पंतप्रधानांनी पाया पडून केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत
न्यू गिनी, दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पापुआ न्यू गिनी या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. पापुआ न्यू गिनीमध्ये सूर्यास्त झाल्यानंतर कोणत्याही परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले जात नाही, पण पंतप्रधान मोदी त्याला अपवाद ठरले आहेत. या देशाने त्यांचे जंगी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले होते. या वेळी पंतप्रधान जेम्स मारापे यांनी विमानतळावर मोदींच्या पाया पडून त्यांना अभिवादन केले. या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. पापुआ न्यू गिनी या बेटाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पापुआ न्यू गिनीमध्ये सूर्यास्त झाल्यानंतर शक्यतो परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले जात नाही, अशी प्रथा आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याला अपवाद ठरले. सायंकाळ होऊनही स्वतः पंतप्रधान जेम्स मारापे यांनी विमानतळावर उपस्थित राहून मोदींचे जंगी स्वागत केले.
‘जी सेव्हन’ देशांची बैठक संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि. २२ मे) प्रशांत महासागरातील देशांना भेटी दिल्या. या वेळी भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य परिषदेत (FIPIC) प्रशांत महासागरातील १४ बेटांच्या देशांना उद्देशून बोलत असताना मोदी म्हणाले की, ज्यांना आपण विश्वासार्ह मानले ते गरजेच्या वेळी आपल्या बाजूंनी उभे नव्हते, पण भारत अत्यंत विश्वासू असा विकासामधील भागीदार राहील. पापुआ न्यू गिनी देशाची राजधानी पोर्ट मोर्सबी येथे फिपिक (FIPIC) परिषद आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बेटांच्या समूहाला संबोधित करताना मोदींनी सांगितले, “ज्यांना आपण विश्वासार्ह समजत होतो, ते गरजेच्या वेळी आपल्या बाजूने उभे राहिले नाहीत. आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करीत असताना एक जुनी म्हण लागू होते, “अडचणीत जो धावून येतो तोच खरा मित्र.” मला आनंद आहे की, करोना महामारी आणि इतर आव्हानात्मक परिस्थितीत भारत आपल्या प्रशांत महासागरातील द्वीपमित्रांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. मग तो लसींचा पुरवठा असो किंवा जीवनाश्यक औषधे, गहू किंवा साखर असो, भारताला जे जे शक्य होईल, त्या पद्धतीने मित्र राष्ट्रांना मदत करण्याचा प्रयत्न केला.”
SL/KA/SL
23 May 2023