या दिवशी होतंय नवीन संसद भवनाचे उद्घाटन
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ मध्ये उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन येत्या २८ मे रोजी होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वा. सावरकर जयंती देखील याच दिवशी आहे. १० डिसेंबर २०२० रोजी मोदी यांनी या भवनाचे भूमिपूजन केले होते. नव्या संसद भवनाच्या बांधकामाला सुमारे ८६२ कोटी रुपये खर्च आला आहे.
जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठ्या अशा या भव्य संसद भवनाची रचना एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे. बिमल पटेल हे या भव्य वास्तूचे शिल्पकार आहेत.
ही ४ मजली वास्तू ६४ हजार ५०० चौरस मीटरमध्ये विस्तारली असून तिला 3 दरवाजे आहेत, त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे देण्यात आली आहेत. खासदार आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेश असून ही इमारत भूकंप रोधक आहे.
संविधान सभागृह हे या नवीन इमारतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या सभागृहात संविधानाची प्रत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, देशाच्या पंतप्रधानांचे मोठे फोटोही लावण्यात आले आहेत.
SL/KA/SL
20 May 2023