ज्ञानवापीतील कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटींगला सर्वोच्च न्यायायाची स्थगिती

वाराणसी,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण व कार्बन डेटिंग करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज१ स्थगिती दिली. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देत न्यायालय म्हणाले – या प्रकरणी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हाय कोर्टाचा आदेश बारकाईने तपासून पहावा लागेल.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीतर्फे अधिवक्ता हुजेफा अहमदी यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा व केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हिंदू पक्षाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.
12 मे रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापीच्या वुजुखानामध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग व वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. हे कसे होणार ते वाराणसी न्यायालय ठरवेल. त्याच्याच निगराणीखाली हे काम होईल, असे उच्च न्यायालय म्हणाले होते.
हिंदू पक्षाच्यावतीने वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी प्रथम एएसआय सर्वेक्षणाच्या अहवालावर विचार करावा. त्यावर न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला. सरन्यायाधीश म्हणाले की, या प्रकरणी न्यायालय प्रथम स्थितीचा आढावा घेईल. कोर्टाने हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळले पाहिजे.
मशीद समितीचे वकील हुजैफा अहमदी यांनी यावेळी न्यायाधीशांचे कौतुक केले. कोर्ट म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होईल. तोपर्यंत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कार्बन डेटिंगच्या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. दुसरीकडे, यूपी व केंद्र सरकारला कार्बन डेटिंगवर आपले स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे.