सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
बंगळुरू, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणूकीत तब्बल दोन दशकांनंतर स्पष्ट बहुमत मिळाल्या नंतर राज्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी शर्थीची चुरस होती. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे बंगळुरुमध्ये मुक्काम ठोकून होते. आज अखेर यावर तोडगा निघाला असून सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.
सिद्धरामय्या उद्या दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधीची तयारीही सुरू झाली आहे. बंगळुरूमध्ये उद्या महत्वाची बैठक पार पडेल. या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
दरम्यान सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणाले होते. त्यांच्या या एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे आता डी के शिवकुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी १३६ जागांवर विजय मिळवत काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळाला आहे. तर भाजपला फक्त ६५ जागांवर विजय मिळवता आला आहे. जनता दल सेक्युलर या पक्षाला १९ जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अपक्ष आणि प्रत्येकी एका जागेवर कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्ष यांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.