चिंताजनक- महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात ३५०० मुली बेपत्ता
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र पोलीसांच्या बेवसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातून तब्बल ३५०० मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुली आणि महिलांची बेपत्ता होणारी आकडेवारी पाहता राज्य महिला आयोग सतर्क झालं आहे. महिला आयोगाकडून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहेत.
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “1 जानेवारी ते 31 मार्चची आकडेवारी पाहिली तर 3594 महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. ही बाब गंभीर आहे. कुणावर टीका करून प्रश्न सुटणार नाही. गृहमंत्र्यांनी यावर तातडीनं काम करावं. प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडहून 82 कुटुंबातल्या महिला बेपत्ता आहेत. राज्य सरकारनं हे गांभीर्यानं घ्यावं यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय”
“भारतीय दूतावासात ही माहिती पाठवली आहे. या मुलींना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिलांना नोकरीच्या आमिषानं नेलं जातं. नंतर त्यांचे कागदपत्र आणि मोबाईल काढले जातात. तपास सुरू आहे. महिलांना शोधण्यात यश मिळेल, अशी मला खात्री आहे. हरवलेल्या व्यक्तींची संख्या पाहता, राज्यातून दुबई आणि ओमानमध्ये महिलांची तस्करी होतेय”, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला.
“शासनाकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. महिला आणि बालविकास मंत्र्यांकडून एक समिती स्थापन करण्यात आली. बेपत्ता महिलांसाठी ही समिती होती. त्यात एकाही पोलिसाची नियुक्ती झाली नाही. जर यातच पोलीस नसतील तर महिलांचा शोध लावणार कोण?”, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केला.
SL/KA/SL
15 May 2023