ऐतिहासिक रामशेज किल्ल्यावर छत्रपती संभाजी जयंती …
नाशिक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात अत्यंत मोजक्या सैनिकांनीशी सुमारे साडेपाच ते सहा वर्ष मुघल सैन्याशी झुंज देऊन अजिंक्य राहिलेल्या आणि शत्रूची हिंदवी स्वराज्याची वाट रोखून धरलेल्या आकाराने छोट्या परंतु कीर्तीने मोठ्या असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
पत्रकार राम खुर्दळ आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील उपेक्षित असलेले गडकोट संवर्धन होण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये गडकोटाचे विविध स्वरूपात संरक्षण , जतन, पर्यावरणाचे रक्षण, उपेक्षित गडकोटाबद्दल सर्वसामान्यांना आणि विशेषता नवीन पिढीला इतिहासाची माहिती, त्यानिमित्ताने गडकोटाचे संवर्धन आणि संरक्षण असे उपक्रम या संस्थेमार्फत राबविल्या जातात.
अत्यंत कडाक्याच्या उन्हात शत्रूच्या विविध हल्ल्यात उध्वस्त झालेल्या वाटांवरून कठीण चढण चढत आलेल्या शिवप्रेमी आबालवृद्धांनी काल रात्रीपासून विविध उपक्रमांनी या जयंती उत्सवात हजेरी लावली. निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसताना अनेक शिवप्रेमींनी गडावरच रात्री मुक्काम करून भजन , कीर्तन, ऐतिहासिक व्याख्यान तर आज रामशेज किल्ल्यावरील गोमुखी द्वार येथे झालेल्या जयंती उत्सवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक , दुर्ग पूजन, नद्यांचे जलपूजन, श्रमदान, साहित्य पूजन करण्यात आले.
गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवरील किल्ले हातगडचे शिवकालीन किल्लेदार वीरगंगाजी मोरे देशमुख यांचे तेरावे वंशज मनोहर मोरे देशमुख , इतिहास अभ्यासक प्राध्यापक रामनाथ रावळ यांच्यासह अनेक इतिहास प्रेमी शासकीय विभागाचे विशेषतः वन विभागाचे अधिकारी, परिसरातील ग्रामस्थ या उत्सवाला उपस्थित होते . गड संवर्धनासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गडमित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गडाच्या परिसरात वारंवार लागलेल्या वणव्या मुळे निसर्ग संपदा नष्ट होऊ नये म्हणून जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
इतिहास अभ्यासक प्राध्यापक रामनाथ रावळ यांचे असा लढला रामशेज या विषयावर व्याख्यान झाले .विविध शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशात गडावर आणि गडाच्या पायथ्याशी शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन केले. इतिहास प्रेमींचा या प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ML/KA/SL
14 May 2023