कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची होणार ऑनलाईन विक्री
नागपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कारागृहातील कैदी दैनंदिन वापरापासून ते शोभिवंत वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतात. पण या वस्तूंच्या विक्रीस मात्र फारसा वाव मिळत नाही. त्यामुळे आता कैदी निर्मित वस्तूंना आता कारागृहातून विक्री करण्यासह ‘ऑनलाईन’ विक्री करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य कारागृह विभाग, अपर पोलीस महासंचालक, अमिताभ गुप्ता यांनी दिली. कारागृहातील वस्तू देशभर पोहोचण्यासाठी कारागृह प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांनी बनवलेली विविध उत्पादने ऑनलाईन पोर्टलवर किंवा ॲप्सद्वारे (फ्लिफकार्ट, ॲमेझॉन, मार्ट) विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कारागृह प्रशासनाने ऑनलाईन विक्रीसाठी तयारी केली असून त्याचे दरपत्रकही तयार करण्यात आले आहे.
राज्यातील कारागृहात पैठणी साडी, लाकडी वस्तू, नऊवार साडी, चपला, टॉवेल, दरी, गणेश मूर्ती, विविध प्रकारची सागवानी लाकडी टेबल, खुर्च्या, कपाट, बेंच, शर्ट, रुमाल, बेडशीट, लेदर बॅग, सँडल, लाकडी शोपीस, पर्यावरणपूरक पिशव्या, जॅकेट, कुर्ता, चामडी कमरपट्टा, आणि बेकरीचे वेगवेगळे पदार्थ ४०० हून अधिक वस्तू तयार केल्या जातात. यांची आता ऑनलाईन विक्री करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी कारागृहातील कारखाना उद्योगाचे ११ कोटी आणि शेतीचे २.४० कोटी रुपयांचे उत्पादन झाले आहे. कारागृहातील वस्तूंची ‘ऑनलाईन’ विक्री सुरू झाल्यास कारागृह विभागाला आर्थिक बळ मिळणार आहे.
SL/KA/SL
5 May 2023