उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात बत्ती गुल ; रुग्णांचे अतोनात हाल
उल्हासनगर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण राज्यात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजने अंतर्गत ३१७ दवाखाने सुरु केले आहेत . मात्र त्यांच्याच जिल्ह्यात असलेल्या उल्हासनगर शहरातील शासकीय रुग्णालयात काही विभागात वीज खंडीत होत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उल्हासनगरात मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात काही भागात मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या रुग्णालयातील २०२ खाटा रुग्णांनी भरलेल्या असताना, रुग्णालय प्रशासना कडून कोणतीही सोय करण्यात आली नसल्याने पूर्ण रुग्णालयात अंधार पसरला होता.तर त्या दिवशी होणाऱ्या शस्त्रक्रिया सुध्दा पुढे ढकलन्यात आल्या आहेत .
या रुग्णालयात नवजात बालक तसेच लहान मुलांचा एन आय एस यु कक्ष आहे. वीज नसल्याने आणि त्यात मच्छरांच्या प्रादुर्भावा मुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला तसेच या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोबाईलच्या टॉर्चच्या मदतीने रुग्णालयात यावे लागत होते.दरम्यान सकाळी ११ वाजता गेलेली वीज रात्री आठ वाजेपर्यंत आली नसून याबाबतीत रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सव डॉ . मनोहर बनसोडे यांच्याशी फोन वर संपर्क साधला असता, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जनरेटर सप्लायर यांच्यातील वादामुळे रुग्णालयात अंधार पसरला असून या दोघांनाही रुग्णालयातर्फे पत्र देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .Batti Gul in Ulhasnagar Central Hospital; Patient emergency
दरम्यान उल्हासनगर शहर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात आहे, तसेच त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील डॉक्टर आहेत, तसेच अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार बालाजी किणीकर हे देखील डॉक्टर आहेत. असे असतांना देखील शासकीय रुग्णालयाची अश्या पद्धतीने दयनीय अवस्था असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
ML/KA/PGB
4 May 2023