कलेक्टर आंबा मिळविणार जीआय टॅगिंग…
गडचिरोली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंबा म्हटलं की लहान थोरांच्या तोंडाला पाणी सुटते. साधारणपणे मुठीत मावणारा आंबा एवढाच आंबा आजवर सर्वसामान्यांनी पाहिला असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील भला थोरला कलेक्टर आंबा म्हणजे आंब्याचे भले-थोरले रूप आहे. आता याच कलेक्टर आंब्याला जीआय टॅगिंग मिळावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न चालविले आहेत.
मधुमेहींसाठी उपयुक्त व खोबरा कैरी म्हणून त्यात असलेला हा आंबा या परिसरात महत्त्वाचा आंबा प्रकार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील टोकावरचा अतिदुर्गम संवेदनशील तालुका म्हणजे सिरोंचा. या तालुक्याला लागून तेलंगणा राज्य आहे. याच सिरोंचा भागातील महत्त्वाचा आंबा प्रकार असलेला कलेक्टर नामक आंब्याचे आता जीआय टॅगिंग केले जाणार आहे.
राज्याचा कृषी विभाग या संदर्भात प्रयत्नशील आहे. 120 वर्षाआधी इंग्रज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशातून सिरोंचा येथे या आंब्याची लागवड केली होती. तेव्हापासून इथले काही प्रमुख शेतकरी कलेक्टर आंबा उत्पादन घेत आहेत. कलेक्टर आंबा हा रसाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. इंग्रज काळात हा आंबा टेबल मॅंगो म्हणून ओळखला जायचा.
जेवणाच्या टेबलावर कापून खाण्याजोगा, अधिक गर असलेला हा आंबा सर्वांनाच हवाहवासा असा आहे. सध्या या आंब्याचे उत्पादन कमी असले तरी शासनाने केलेल्या प्रयत्नामुळे यात वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे.
सिरोंचा येथील या आंब्याचे महत्त्व ओळखून कृषी विभागाने जीआय टॅगिंग बाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. या भागातील जमीन व एकूण हवामान बघता हा आंबा या भागामध्ये रुजण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. विशेष म्हणजे या आंब्यात साखरेचे प्रमाण कमी असल्याने हा आंबा मधुमेहींसाठी देखील उपयुक्त आहे.Collector mangoes will get GI tagging…
मोठ्या वजनाचा आंबा
सर्वसाधारण आंब्याचे वजन तीन किलो व आसपास असले तरी कमाल वजन पाच किलो पर्यंत होऊ शकते. त्यासाठी देखील शेतकऱ्यांनी नियोजन करणे आवश्यक आहे. वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या चवीचा व खोबरा कैरी म्हणून ख्यात असलेला कलेक्टर आंबा संवर्धित करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
एखाद्या उत्पादनाचे भौगोलिक मानांकन मिळणे म्हणजे मोठा सन्मान आहे. प्रशासनाने कलेक्टर आंब्याबाबत सुरू केलेल्या जीआय टॅगिंगच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ML/KA/PGB
4 May 2023