अत्याधुनिक पद्धतीने होणार पोटविकारांचे निदान

 अत्याधुनिक पद्धतीने होणार पोटविकारांचे निदान

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईकरांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य प्रशासन कटिबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून पश्चिम उपनगरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे एन्डोस्कोपी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे अत्याधुनिक पद्धतीने पोटविकारांचे निदान करणे शक्य होणार आहे. पालिका आयुक्तांनाच्या निर्देशाने मुंबईकरांना अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विलेपार्ले स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने एन्डोस्कोपी सेवा सुरु करणे, हा त्याचाच एक भाग आहे. या एन्डोस्कोपी सेवेचे लोकार्पण शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि प्रख्यात एन्डोस्कोपिस्ट डॉ. मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेष मोहिते, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर आणि शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. स्मृती घेटला यांची उपस्थिती होती. डॉ. मोहन जोशी यांनी ‘एन्डोस्कोपी कशी करावी’ या विषयावर वैद्यकीय विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. एन्डोस्कोपी ही पोटविकारांचे निदान करण्यासाठी केली जाणारी अत्याधुनिक प्रक्रिया आहे. या अंतर्गत अत्यंत सूक्ष्मपणे पाहू शकणारी दुर्बिण ही एन्डोस्कोपच्या मदतीने शरीराच्या नैसर्गिक छिद्रांतून शरीराच्या आत सोडली जाते. एन्डोस्कोप ही एक लांब, पातळ आणि लवचिक नलिका असते. या नलिकेच्या पुढील बाजूस उच्च क्षमतेचा कॅमेरा असतो. त्या माध्यमातून पोटातील विविध अवयवांच्या प्रतिमा डॉक्टरांना संगणक किंवा अन्य पटल (स्क्रिन) वर पाहू शकतात. याद्वारे वैद्यकीय तज्ज्ञांना विविध आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होते. कूपर रुग्णालयातील एन्डोस्कोपी सेवा सुरू झाल्याने येथे येणाऱ्या विशेषतः पश्चिम उपनगरातील रुग्णांना मोठी मदत होणार आहे. अधिष्ठाता डॉ. शैलेष मोहिते व त्यांच्या सहकारी वैद्यकीय चमूने रुग्णसेवेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने सातत्याने पाठपुरावा करुन एन्डोस्कोपी सुविधा सुरू करण्यात यश मिळवले आहे.

ML/KA/PGB 28 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *