महिला कुस्तीपटूंची सर्वोच्च न्यायालयात धाव

 महिला कुस्तीपटूंची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यातील वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी महिला कुस्तीपटू रविवारपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनाला बसल्या आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी अनुभवी बॉक्सर एमसी मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय देखरेख समितीची घोषणा केली होती.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मादणीसाठी महिला कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. विनेश फोगटसह 7 महिला कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.

या महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दिली होती. तक्रार दाखल करुनही अद्याप त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या कुस्तीपटूंनी आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO ACT) गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून अहवाल मागवला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आतापर्यंत सात तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्वांची चौकशी केली जात आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल.’, असे देखील त्यांनी सांगितले.

SL/KA/SL

24 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *