112 वर्षे जुन्या पुलाच्या दगडांचा वापर ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारासाठी
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईत भारतातली पहिली रेल्वे धावली, हीच रेल्वे अर्थात मुंबईची लोकल आज मुंबईची जीवन-वाहिनी म्हणून ओळखली जाते. याच जीवन-वाहिनीच्या मार्गांवरुन मुंबईत विविध ठिकाणी पूल आहेत. मुंबईतील वाहतूक सुलभ करणारे बहुतांश पूल हे पालिकेच्या अखत्यारित आहेत. यापैकी अनेक पुलांनी आपल्या वयाची शंभरी पार केली असून ब्रिटीश काळात बांधलेल्या रे-रोडच्या 112 वर्षे जुन्या रेल्वे पुलाचा पुनर्विकास महापालिकेने सध्या हाती घेतला आहे. या जुन्या पुलाच्या बांधकामात दगडांचा अतिशय योग्य आणि सौंदर्यदृष्टीपूर्ण वापर करण्यात आला होता. त्यामुळे पुनर्विकासादरम्यान काढण्यात आलेले पुलाचे दगड हे टाकून देण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करण्याचा निर्धार पालिकेच्या पुरातन वास्तू जतन खात्याने केला होता. त्यानुसार आता या दगडांचा अत्यंत कल्पक आणि अभिनव पुनर्वापर करण्यात आला आहे. सदर कार्यवाही अंतर्गत मुंबईचे ऐतिहासिक वैभव असणा-या आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान असणा-या ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारासाठी करण्यात आला आहे. यामुळे ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराला ख-या अर्थाने एक ऐतिहासिक रुपडे बहाल झाले आहे.
रे रोड पुलाच्या कामादरम्यान ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा नमुना असलेले सुंदर बांधकाम जेसीबीच्या एका फटकार्यात जमिनदोस्त होऊ शकले असते. परंतु, तेथील ऐतिहासिक आणि कलात्मक दगड जतन करण्याच्या उद्देशाने आणि पुरातन वास्तूजतन कक्षाने अत्यंत विचारपूर्वक व काळजीपूर्वक केलेल्या कार्यवाहीमुळे सदर दगडी खांब जसेच्या तसे दुसरीकडे उभे करण्याची किमया प्रत्यक्षात आली आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानासारख्या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या जागेच्या ठिकाणी या शतकपूर्ती करणा-या ब्रिटीशकालीन दगडांचा पुनर्वापर असा एक नवा संदर्भही यानिमित्ताने जोडला गेला आहे. 112-year-old bridge stones used for the entrance to the August Revolution Maidan
गतवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात रे-रोड पुलाच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पास सुरूवात झाली. त्याचवेळेस ऑगस्ट क्रांती मैदानाच्या जिर्णोद्धार व संवर्धनाचे काम देखील सुरू होते. त्यामुळे रे-रोड पुलाच्या दगडी खांबांना पुन:र्स्थापित करण्याचा निर्धार महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन खात्याने केला. त्यानंतर नियोजनबद्धरित्या व शास्त्रोक्त पद्धतीने खांबांच्या दगडांना व्यवस्थित क्रमांक देऊन, एक-एक दगड काळजीपूर्वक सुटा करण्यात आला. हे सर्व दगड ऑगस्ट क्रांती मैदानाच्या कामाच्या ठिकाणी नेण्यात आले व पुन्हा एकदा हे खांब पूर्वी जसे होते, तसेच उभे करण्यात आले. फक्त आता त्या दगडांचे ठिकाण वेगळे होते ! या अतिशय नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीच्या कामामुळे ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराला एक ऐतिहासिक, अभिनव, भव्य व आकर्षक रुपडे प्राप्त झाले आहे.
ML/KA/PGB
19 Apr 2023