या जिल्ह्यात फक्त २८ टक्के पाणीसाठी शिल्लक
चंद्रपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे राज्यातील काही भागात आता जलाशयांमधील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. राज्यातील सर्वांत उष्ण जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मिळून आता फक्त सरासरी २८ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. त्यामुळे भरभर घटणाऱ्या पाणी साठ्यामुळे जिल्ह्याला मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे.
यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती पाहता भविष्यात गंभीर जलसंकटातून जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांपैकी चंदई प्रकल्प कोरडा झाला आहेत. पावसाळ्यात जिल्ह्यातील नद्या, नाले, जलाशय दुथडी भरून वाहत होते. मात्र उन्हाळा सुरू होताच जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला.
जलाशय आणि शिल्लक पाणी साठा टक्केवारी
लभनसराड – २४
नालेश्वर ३७
चारगाव ३३
असोलामेंढा ८१.३७,
घोराझरी १९,
अमलनाला ३०,
पकडीगुड्डम ३१,
डोंगरगाव ६५,
इराई ५३.१७
एप्रिल महिन्यात या धरणांची हीच अवस्था अशीच राहिल्यास येत्या काळात नागरिकांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते. धरणांची स्थिती बिकट असतानाही जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात पाणी दिले जात आहे. उद्योगांना पाणी मिळत आहे, मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा आरोपही होत आहे.शेतकऱ्यांनी पेरणी केली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला मात्र त्याचा जलाशयांवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
SL/KA/SL
18 April 2023