ठाकरेंचा सध्या दार खटखटवण्याचा कार्यक्रम सुरू
मुंबई , दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जेव्हा उध्दव ठाकरे , आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हिंदुत्ववादी होते तेव्हा, दार उघड बये दार.. हे जगदंबे चरणी गाणे म्हणत होते. मात्र जेव्हा पासून त्यांनी हिंदुत्व सोडले त्या दिवसापासून ते दार खटखटाव भाई दार खटखटाव असा कार्यक्रम करीत आहेत. कधी ते तेजस्वी यादव, कधी केजरीवाल, कधी टिआरएस अशाच प्रकारे आता ते राहुल गांधीचे हे दार खटखटवायला जातील, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जेव्हा उध्दव ठाकरे चालत होते तेव्हा प्रत्येकजण मातोश्रीवर जात होता. मातोश्रीचा आदर होता पण ज्या दिवशी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्या दिवसापासून त्यांना मतांसाठी अनेकांच्या दारोदारी भटकावे लागते आहे. मातोश्रीचे महत्व त्यांनीच कमी केले. “हर दर पर जो झुक जाए उसे सर नही कहते.. !”अशी टीका आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर जे बोलत आहेत हे म्हणजे तुफान येण्यापूर्वीची भिती आहे. अमित शाह येणार म्हणजे तुफान येणार त्यामुळे छोटया छोटया बीळात राहणारे प्राणी चिवचिवाट करीत आहेत, असा टोलाही आमदार ॲड आशिष शेलार यांनी लगावला.खासदार संजय राऊत हे सर्टीफीकेट घेऊन ४० खासदार बनवणार असतील तर अशी सर्टीफिकेट आम्ही आमच्या घराबाहेर आले तर देऊ. ते स्वप्नात जगत आहेत अशा स्वप्नात जगणाऱ्यांना एक जालिम उपाय आमच्याकडे आहे आमच्या घराबाहेर यावे आम्ही तो देतो, तसेच संजय राऊत यांनी तरी संविधान धोक्यात आहे हे म्हणू नये संविधानामुळेच त्यांना जामिन मिळाला आहे म्हणून ते जेलच्या बाहेर आहेत, असा टोला त्यांनी लगावला. अनिल परब, हसन मुश्रीफ यांना जो अंतरिम दिलासा वारंवार मिळतोय त्याचीही त्यांनी आठवण करून दिली. रात्री साडेनऊला लोक टिव्ही लावतात कारण त्यावेळी सिरियल सुरू होतात आणि सकाळी साडेनऊ वाजता लोक टिव्ही बंद करतात कारण त्यावेळी “सिरियल किलर” बोलायला येतात, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.
ML/KA/PGB 14 APR 2023