आता व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प

 आता व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन साधण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवासंदर्भात चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ना सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर , वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख वाय एल पी राव, प्रधान मुख्यवनसंरक्षक महिप गुप्ता, गुरुप्रसाद आदी अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान यावर सविस्तर चर्चा करताना मुनगंटीवार म्हणाले की, या समस्येवर केवळ शेतकऱ्याना नुकसान भरपाई हा उपाय नसून वन्य प्राण्यांना विशेषतः हत्तीना गावापर्यंत, शेतांपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी काय योजना करता येतील याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी हत्ती संवादकाची मदत घेता येईल असेही त्यांनी सूचविले. यावेळी देशातील ऩऊ राज्यात वन्य हत्तींशी संवाद साधून त्यांना नियंत्रित करणारे प्राणी संवादक आनंद शिंदे यांच्या कामांविषयी सादरीकरणही करण्यात आले. पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी देशातील उद्योग जगताकडून मिळणाऱ्या सीएसआर निधीपैकी शून्य पूर्णांक पाच टक्के निधी देणे बंधनकारक करावे अशी विनंती केंद्र शासनाला केली जाईल असे ते म्हणाले. हत्तींना गावापर्यंत येण्यास रोखण्यासाठी एलिफंट प्रूफ फेन्स अर्थात एपीएफ़ करीता मनरेगा या योजनेतून निधी मिळावा या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.जंगलातील झाडे कटाई बाबत परवानगी देताना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि ऑफलाइन परवानगी बंद करण्याचे निर्देश ना मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. कोल्हापूर जिल्ह्यात गवा या प्राण्यांचा उपद्रव गंभीर असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करुन लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांशी संवाद वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ML/KA/PGB 14 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *