काँग्रेसकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम गौरव समितीची स्थापना.

 काँग्रेसकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम गौरव समितीची स्थापना.

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच या लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील गौरव समिती मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

या गौरव समितीत अध्यक्ष अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री अमित देशमुख यांच्यासह २७ सदस्य आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला तरी निजामाच्या अधिपत्याखालील मराठवाडा तसेच चंद्रपूर व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांसह संपूर्ण हैद्राबाद संस्थान पारतंत्र्यातच होते. Establishment of Marathwada Mukti Sangram Gaurav Samiti by Congress.

निजामाने स्वतंत्र भारतात सामिल होण्यास नकार दिल्याने थोर गांधीवादी नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्तिसंग्राम सुरू करण्यात आला. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिले, अत्याचार सहन केला. अखेर भारत सरकारने हैद्राबाद संस्थानामध्ये पोलीस कारवाईला सुरूवात केली आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. महाराष्ट्रात या लढ्याला मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणून ओळखले जाते.

१७ सप्टेंबर २०२२ पासून या ऐतिहासिक लढ्याचे ७५ वे अर्थात अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. खरेतर हे वर्ष शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरे होणे आवश्यक होते. त्याबाबत राज्य सरकारला अनेकदा स्मरण करून देण्यात आले. मात्र, मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाबाबत शासनाची अनास्था व उदासीनताच दिसून आली असा आरोप काँग्रेसने केला आहे.

हे ऐतिहासिक ७५ वे वर्ष सुरू होऊन आता ७ महिने उलटले आहेत तरीही राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही लक्षवेधी व व्यापक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसून येत नाही असे स्पष्ट करीत, काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील व या कार्यक्रमातून स्वातंत्र्यसेनिकांचा सन्मान केला जाईल व जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत त्यांच्या वारसांचाही सन्मान केला जाणार आहे असे काँग्रेसच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

ML/KA/PGB
13 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *