असा असेल यंदाचा पाऊस
मुंबई,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या कृषीप्रधान देशात अजूनही बहुतांश शेती कोरडवाहू असल्यामुळे आत्ता अवकाळीच्या तडाख्यात सापडूनही येता पावसाळा कसा असेल याकडे बळीराजाचे लक्ष लागलेले असते. ‘स्कायमेट’ या महत्त्वाच्या हवामान विषयक संस्थेनं यावर्षी होणाऱ्या मान्सून बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल महाराष्ट्रासाठी काहीसा चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.
काय आहे अहवाल?
संपूर्ण दक्षिण आशियात जून ते सप्टेंबर या काळात हे वारे सक्रिय असतात. या वाऱ्यांचा अभ्यास करून सरकारी वेधशाळा आणि विविध खासगी कंपन्या मान्सूनचा अंदाज जाहीर करतात. भारतातील आघाडीची वेदर फोरकास्टिंग आणि अॅग्रीकल्चर रिस्क सोल्युशन कंपनी असलेल्या स्कायमेटनं वर्तवलेल्या 2023 या वर्षातील मान्सून अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी 94 टक्के (+/- 5 टक्के एरर मार्जिनसह) पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच या वर्षी आपल्याकडे मान्सून ‘सामान्यपेक्षा कमी’ राहण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत भारतात सरासरी 868.6 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. लाँग पिरीयड सरासरीच्या 90 ते 95 टक्के हे प्रमाण आहे. स्कायमेटनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. स्कायमेटनं 4 जानेवारी 2023 रोजी या वर्षीचा सर्वात पहिला मान्सून फोरकास्ट जाहीर केलं होतं. आपल्या या पहिल्या प्राथमिक अंदाजावर ठाम राहत स्कायमेटनं या वर्षी मान्सून सामान्यपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे.
देशाच्या उत्तर आणि मध्य भागांना पावसाची कमतरता असण्याचा धोका स्कायमेटला जाणवत आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मान्सूनच्या मुख्य महिन्यांत अपुरा पाऊस पडेल. महाराष्ट्रात या कालावधीमध्ये जोरदार पाऊस असतो. 26 जुलै रोजी काही वर्षांपूर्वी मुंबईत झालेला पाऊस सर्वांच्याच लक्षात आहे. त्याच कालावधीत यंदा कमी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केलाय.
उत्तर भारतातील अॅग्रीकल्चरल बाउल असलेल्या पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मान्सूनच्या दुसऱ्या भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिनसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ट्रिपल-डिप-ला नीनाच्या (ला निना ही एक महासागरीय आणि वातावरणीय घटना आहे) सौजन्यामुळे गेल्या सलग चार हंगामांमध्ये सामान्य आणि सामान्यापेक्षा जास्त नैऋत्य मोसमी पडला. आता, ला निनाचा प्रभाव संपला आहे. मुख्य सागरी आणि वातावरणीय व्हेरिएबल्स ENSO या तटस्थ परिस्थितीशी सुसंगत आहेत. आता एल निनोची शक्यता वाढत आहे आणि पावसाळ्यात ती आपल्या प्रबळ श्रेणीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढत आहे. एल निनोच्या पुनरागमनामुळे मान्सूनची पूर्वस्थिती कमकुवत असू शकते”.
SL/KA/SL
10 April 2023