पदवीचा प्रश्न मोठा की बेरोजगारीचा
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी याविषयी देशातील राजकीय वर्तुळात मतमतांतरे व्यक्त होत असताना आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या सावध शैलीत पंतप्रधानांचे नाव न घेताच या विषयावर सुचक भाष्य केले आहे.
“आपल्या देशातल्या लोकांसमोर डिग्रीचा प्रश्न आहे का? तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? त्यांची डिग्री काय? हे जास्त महत्त्वाचं आहे का? बेकारी, महागाई, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहे. त्याबाबत या राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांनी कोणती पदवी शिक्षण घेतले आहे, हे जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा अवलंब केला होता.मात्र या प्रकरणी सुरत हायकोर्टाने हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल केजरीवाल यांना २५ हजार रुपये दंड ठोठावला, त्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले.
शरद पवार यांनी डिग्री हा महत्त्वाचा प्रश्न नाही असं म्हटलेलं असताना संजय राऊत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीबाबतच्या माहिती मागणी लावून धरली आहे. लाखो, कोट्यवधी डिग्रीधारक बेरोजगार आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री विचारली जाते आहे. ती त्यांनी दाखवली पाहिजे. त्यात काही चुकीचं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी -२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा करीश्मा निर्माण केला तो डिग्रीच्या जोरावर केला का? त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा आपला करीश्मा निर्माण केला आहे. त्यामुळेच भाजपाचा विजय झाला त्याचं सगळं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जातं. डिग्रीवर काय? आत्तापर्यंत जे जे देशाचे पंतप्रधान झाले त्यांना बहुमताचा आदर करूनच निवडलं गेलं आहे. असं मत यांनी मांडलं आहे.
SL/KA/SL
10 April 2023