विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी पालिकेची ‘एकच लक्ष्य-एक लक्ष’ मोहीम

 विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी  पालिकेची ‘एकच लक्ष्य-एक लक्ष’ मोहीम

मुंबई दि .३० (एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढीचा आलेख उंचावत असून यंदा ‘मिशन ऍडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या ५ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंतच्या कालावधी दरम्यान पटनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

या पटनोंदणी मोहिमेत मागील वर्षाच्या पटसंख्येच्या तुलनेत एक लाख वाढीव प्रवेश देण्याचे उद्दिष्ट्य निर्धारित करण्यात आले आहे. नियमित व प्रचलित पद्धतीने शाळा प्रवेश देण्याबरोबरच यंदा क्युआर कोड, ऑनलाइन लिंक याद्वारेही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याचबरोबर या अनुषंगाने काही समस्या उद्भवल्यास त्याचे तात्काळ निवारण करता यावे, यासाठी हेल्पलाइन क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.
पालिका शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या पूर्व प्राथमिक (बालवाडी), प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलगू, कन्नड आणि गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जाते.
मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी पटसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. पटसंख्या वाढीचा आलेख असाच उंचावण्यासाठी २० मार्च २०२३ पासून ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष्य’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यंदा १ लाख वाढीव प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इयत्ता पहिली, पाचवी आणि नववीत वर्गोन्नतीने आलेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ करण्याचे नियोजन आहे.
सर्व माध्यमांच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्राथमिक शाळांमध्ये शेवटच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले परीक्षेच्या निकालानंतर महापालिका माध्यमिक शाळांकडे हस्तांतरित करणे अनिवार्य आहे. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना समन्वय साधण्याचे निर्देश आहेत.
महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाडीतील तसेच अंगणवाडीतील सर्व बालकांचे प्रवेश ‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये करण्याची जबाबदारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, विभाग निरीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये प्रवेश घेतलेली बालके ही शाळेच्या शेवटच्या इयत्तेपर्यंत आपल्याच शाळेत राहतील, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शाळेची असेल. प्रत्येक शाळेतून जितके दाखले जातील, तितके नवीन प्रवेश करून घेण्याची जबाबदारी शाळा प्रमुखांची असेल. प्रत्येक शिक्षकांना शाळा स्तरावर किमान दहा नवीन प्रवेशाचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच शाळा स्तरावर नवीन प्रवेशासाठी शालेय व्यवस्थापन समिती व पालक सभा घेणे, शिक्षकांनी गृहभेटी देऊन पालकांना शाळा प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे, ऑनलाईन प्रवेश देणे, पथनाट्याद्वारे जनजागृती करणे, व्हिडीओद्वारे प्रचार प्रसार करणे आदी उपक्रम यंदा राबविले जाणार आहेत.
शाळा स्तरावर दररोज झालेल्या नवीन प्रवेशांची माहिती प्रत्येक शाळांना ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे.
मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी तीन प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये पाल्याचे नाव, पालकांचा मोबाईल क्रमांक, प्रवेशाचे ठिकाण, प्रवेशाची इयत्ता व प्रवेशाचे माध्यम इत्यादी बाबींचा समावेश आहे. याद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे संबंधित पाल्याच्या प्रवेशाची माहिती परिरक्षित करण्यात येणार आहे. महापालिकेने उपलब्ध करून दिलेला ‘क्युआर कोड’ स्कॅन करून पालकांना शाळा प्रवेशासाठी मुलभूत माहिती भरून प्रवेश घेता येईल. तसेच http://bit.ly/bmc_mission_admission _2023-24 या लिंकवर क्लिक करून मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पाल्यांचा प्रवेश निश्चित करता येईल. याखेरीस शाळा प्रवेशासाठी ७७७७-०२५-५५७५ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ५ या वेळेत व्हाॅट्सअॅप मेसेजद्वारे शाळा प्रवेशाची माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

SW/KA/SL
30 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *