इस्रोने एकाच वेळी केले ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण
श्रीहरिकोटा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात मान्यता प्राप्त अशी भारताची इस्रो ही संस्था प्रगतीची शिखरे पार करत असते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘एलव्हीएम३’ या सर्वात मोठय़ा प्रक्षेपणास्त्राच्या मदतीने ब्रिटनस्थित ‘वनवेब ग्रूप कंपनी’चे ३६ इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. सर्व उपग्रह नियोजित कक्षेत स्थिर झाले असून त्यांच्याशी संपर्कही प्रस्थापित करण्यात आला आहे. ‘इस्रो’ची व्यावसायिक उपशाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया प्रा. लि.’ची ही दुसरी यशस्वी मोहीम आहे.
कमी उंचीच्या कक्षेत (लो-अर्थ ऑर्बिट) एकूण ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने ब्रिटनच्या नेटवर्क अॅक्सेस असोसिएट्स लि. (वनवेब ग्रूप कंपनी) सोबत करार केला आहे. त्यातील पहिले ३६ उपग्रह २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. तर उर्वरित ३६ उपग्रहांचा दुसरा ताफा रविवारी सकाळी ९ वाजता तमिळनाडूतील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या तळावरून प्रक्षेपित करण्यात आला. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल एनएसआयएल, इस्रो आणि वनवेब यांचे अभिनंदन केले. ‘वन वेब’ने सर्व उपग्रहांशी यशस्वीरीत्या संपर्क प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंह यांनी यशस्वी मोहिमेसाठी इस्रोचे अभिनंदन केले आहे. ‘एनव्हीएम ३द्वारे वन-वेबचे ३६ उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्याबद्दल एनएसआयएल, इन-स्पेस, इस्रो यांचे अभिनंदन. जागतिक दळणवळण उपग्रहांच्या प्रक्षेपणामध्ये भारताचे वाढते महत्त्व यामुळे अधोरेखित झाले असून हा आत्मनिर्भरतेचा खरा प्राण आहे,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.
SL/KA/SL
27 March 2023