आता आकासा ही घेणार आकाशझेप

 आता आकासा ही घेणार आकाशझेप

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील विमान उड्डाण क्षेत्रात दिवसेंदिवस उर्जितावस्था प्राप्त होताना दिसत आहे. केवळ ७ महिन्यांपूर्वी बाजारात दाखल झालेली अकासा एअर या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा विचार करीत आहे. शेअर बाजारातील प्रभावी व्यक्ती म्हणून ख्याती असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची असलेल्या अकासा एअरने तिचे कामकाज वाढवण्याच्या योजनेवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एकीकडे कंपनीचे विमान उड्डाण सेवेत सुधारणा करण्याचे नियोजन आहे. कंपनी आपली एकूण कर्मचारी संख्या ३,००० पर्यंत वाढवणार आहे.

एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर टाटा समूहाने ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे, त्यामुळे तिथे हजारो लोकांची भरती करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आता Akasa Air देखील मोठ्या प्रमाणावर विमानांची ऑर्डर देणार असून, १,००० लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत.

आकासा एअरचे सीईओ विनय दुबे यांनी एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कंपनी मार्च २०२४ पर्यंत १,००० लोकांची भरती करेल. तसेच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३,००० च्या वर नेईल. यामध्ये देखील सुमारे १,१०० फक्त वैमानिक आणि विमान कर्मचारी असतील. विमान वाहतूक क्षेत्रात भरती नेहमीच मोठ्या प्रमाणात केली जाते, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

. कंपनीने २०२३ च्या अखेरीस ३ अंकांत म्हणजेच १०० हून अधिक नवीन विमाने ऑर्डर करण्याची योजना आखली आहे. आकासा एअरने सध्या ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी १९ विमाने आधीच ताफ्यात सामील झाली असून, एप्रिलमध्ये २० वे विमान मिळणार आहे. यामुळे कंपनी आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू करू शकणार आहे.

एकंदरीतच यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात चलती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत. त्या बरोबरच या क्षेत्रातील स्पर्धा वाढल्याने प्रवाशांना तिकिट दरातही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
SL/KA/SL
25 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *