विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना मिळणार मोफत सेवा करण्याची संधी
पंढरपूर,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता इच्छूक भाविकांना मोफत सेवा देता येणार आहे. मंदिर समितीकडून काही अटी आणि शर्तीच्या आधारे भाविकांना प्रायोगिक तत्वावर सेवेची संधी देण्याचा विचार करत आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
मंदीरात सध्या अडीचशेहून अधिक कायम कर्मचारी आणि शेकडो हंगामी कर्मचारी यांच्या मदतीने मंदीर प्रशासन ३६५ दिवस २४ तास दैनंदिन कारभार चालवते. यामध्ये सेवाभावी वृ्त्तीने काम करू इच्छिणाऱ्या भाविकांचा हातभार लागल्यास व्यवस्थापन खर्चात मोठी बचत होईल तसेच भाविकांना भगवंताच्या सेवेचा आनंदही घेता येईल.
या सेवाकार्यामध्ये सहभागी होण्यास महिला भाविक ही उत्सुक आहेत. प्रायोगिक तत्वावर भक्तांकडून मोफत सेवा घेण्याचा विचाराधिन असलेला उपक्रम प्रत्यक्षात आल्यास भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळणार आहे.
सध्या राज्यातील शेगाव येथील गजानन महाराज मंदीर आणि गोंदवले येथील मंदिरात भाविकांकडून मोफत सेवा घेतली जाते. सामान्य भाविकांसह मोठ मोठ्या पदांवर असलेल्या व्यक्ती देखील या सेवा कार्यात आनंदाने सहभागी होतात.
SL/KA/SL’
11 March 2023