टांझानियाच्या मंत्र्यांची विधानसभेला भेट
मुंबई, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे टांझानियासह आफ्रिकी देशांशी पूर्वापार मैत्रीसंबंध असून आगामी काळात कोळसा, वीज, बंदर निर्मिती, साखर निर्यात, पायाभूत सुविधांची उभारणी यासंदर्भात सहकार्य आणि व्यापार विस्ताराची विपूल संधी उपलब्ध आहे, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
आज टांझानिया देशाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री प्राध्यापक मकामे एम्बारवा, टांझानिया बंदर प्राधिकरणाचे संचालक प्लॅड्युस एम्बोसा आणि अन्य उच्चाधिकारी यांनी विधानसभा अध्यक्ष यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.
प्राध्यापक मकामे एम्बारवा यांनी विधानसभा अध्यक्ष आणि सन्माननीय सदस्यांच्या शिष्टमंडळास टांझानिया भेटीचे निमंत्रण दिले. टांझानियात उत्खननाद्वारे सापडणारा कोळसा हा अतिशय उच्चप्रतीचा आहे. भारताला त्यादृष्टीने आयात संधी उपलब्ध आहे तर साखरेच्या बाबतीत टांझानियातील मोठी गरज लक्षात घेता येथे निर्यात संधी उपलब्ध आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी विधानपरिषदेतील सदस्य जयंत पाटील तसेच माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य जयंत पाटील, टांझानियाचे अन्य उच्चाधिकारी उपस्थित होते. परदेशी पाहुण्यांनी यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजाचे राजदूत गॅलरीतून अवलोकन केले.
ML/KA/SL
9 March 2023