सचिन धर्माधिकारी यांना डी. लिट प्रदान
नवी मुंबई,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना आज राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी (डी. लिट्.) प्रदान करण्यात आली.
वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आदी मान्यवर उपस्थिती होते. तसेच जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रायगडभूषण’ डॉ. सचिन धर्माधिकारी यांना यापूर्वी युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठ, फ्रान्सच्या ‘डी. लिट.’ पदवीसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
श्री. सचिनदादा धर्माधिकारी हे गेली अनेक वर्षे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. हे प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड येथून कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाज ऋणांची जाणीव ठेवून हे प्रतिष्ठान सातत्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम साकारत आलेले आहे. यातील प्रमुख प्रकल्प असे आहेत, वृक्षारोपण आणि संगोपन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप, रक्तदान शिबीरे, निःशुल्क आरोग्य निदान आणि उपचार, आरोग्य विषयक जनजागृती शिबीरे. पाणपोयांची निर्मिती, बस थांब्यांवर निवाऱ्यांची निर्मिती, कालवे, सरोवरे, नद्या आणि धरणांमधील गाळांचा उपसा करणे, स्पर्धा परीक्षा आणि व्यवसायांसाठी मार्गदर्शन शिबीरे, दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शारीरिकदृष्टया अक्षम आणि मुक-बधीर व्यक्तींना आवश्यक मदत.
SL/KA/SL
5 March 2023