हिंद अयान ही बहुस्तरीय सायकलिंग शर्यत ठाण्यातून मुंबईकडे
ठाणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच, भारतीय सायकलिंग संघांना देशातच सराव करण्याची संधी देण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ‘ हिंद अयान’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
हिंद अयान, पहिली बहुस्तरीय सायकलिंग शर्यत, टूर डी फ्रान्सच्या धर्तीवर, पाच फेब्रुवारी रोजी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरू झाली. दिल्ली-आग्रा-जयपूर-भिलवाडा-उदयपूर-गांधीनगर
मार्गे ती १६ फेब्रुवारीला ठाण्यात पोहचली आणि आज सकाळी ठाण्याहून मुंबईला रवाना झाली.
या प्रवासात ठाणे, मुंबईतील सायकलपटू ठाणे महापालिका ते मुंबई महापालिका या जॉय राइडमध्ये सहभागी झाले आहेत.
‘हिंद अयान’ हे ५० सायकलपटूंचे पथक आहे. काल सायकलपटूनी ठाणे शहरातील शाळा आणि हेरिटेज वास्तूंना भेट दिली. आज सकाळी ठाणे महापालिका मुख्यालय येथून ते मुंबई महापालिकेच्या दिशेने रवाना झाले. या जॉय राईडला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे उपस्थित होत्या.
नेमकी कशी आहे ही शर्यत
या शर्यतीचे आयोजक आणि पाच खंडांतील ३५ देशांमधून फिरून संपूर्ण जगाला प्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय सायकलपटू विष्णुदास चापके यांनी या शर्यतीबद्दल माहिती दिली.
सध्या भारतात लांब पल्ल्याच्या सायकलिंगची शर्यत नाही. त्यामुळे ऑलिम्पिक संघ, राष्ट्रीय सायकलिंग संघ, पोलीस आणि सैन्यातील सायकल पटूंना लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये भाग घेण्यासाठी परदेशात जावे लागते. म्हणूनच, सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील सायकलिंग संघांना सराव करण्याची संधी देण्यासाठी, ‘ हिंद अयान ’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित केली आहे. ठाणे ते मुंबई असा प्रवास करून १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी पुण्यात शर्यतीची सांगता होणार आहे.
केंद्र सरकारची मान्यता
या शर्यतीस केंद्र सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण तसेच, युवक कार्यक्रम व खेळ विभाग यांनी मान्यता दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने लष्कर आणि नौदलाचे जवान पाठवले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यमुना एक्स्प्रेस वेवर सायकल चालवण्याची विशेष परवानगी दिली. मुंबईत रविवारी सी लिंकवरून प्रवासाची संधी मिळावी, अशी अपेक्षा विष्णुदास चापके यांनी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला पुण्यात हिंद अयान चा समारोप होणार आहे. ही शिवजयंती सायकल चालवून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करूया आणि सिंहगडाच्या पायथ्याशी भेटूया असे आवाहनही चापके यांनी केले आहे.
ML/KA/SL
18 Feb. 2023