दुष्काळी पट्ट्यात फुलली स्ट्रॉबेरीची शेती….

 दुष्काळी पट्ट्यात फुलली स्ट्रॉबेरीची शेती….

सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हा तसा दुष्काळी भाग. मात्र याच पूर्व भागात टेम्भू योजनेतून कृष्णेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे जीवनच बदलून गेले आहे. बदललेले पर्जन्यमान, योजनेचे पाणी यामुळे आधी कुसळ सुद्धा उगवत नसलेल्या जमिनीत आता ऊसाच्या शेतीसह नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागलेत.

यातच आता खानापूर घाटमाथ्यावर स्ट्रॉबेरीची शेती फुललेली आहे. घाटमाथ्यावरील राहुल भगत या युवा शेतकऱ्याने या भागात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केला आणि तो यशस्वी करुन दाखवलाय. ही शेती फुललीय सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावर.

अशी घडली किमया

खानापूर घाटमाथ्यावर टेंभू सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी आले आणि काही वर्षापासून या घाटमाथ्यावरील शेती बहरली. त्यामुळे या ठिकाणी राहुल आणि अमोल भगत या तरुण शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पीक या भागात घेण्याचे धाडस दाखवले. 4 महिन्याने फळ देणाऱ्या या स्ट्रॉबेरीच्या लागवड आणि औषधांचा असा सगळा जवळपास 4 एक लाख खर्च भगत यांना आला.

मात्र, 4 महिन्यामध्ये स्थानिक बाजारपेठे बरोबरच सांगली, कोल्हापूर मार्केटला भगत यांची स्ट्रॉबेरी विक्रीस गेली. यात सगळा खर्च सोडून भगत यांना 3 लाखाच्या आसपास फायदा झाला.

दुष्काळी भागाचे रुप पालटले

२०१६ साल पर्यंत आटपाडी आणि खानापूर तालुक्याचा घाटमाथा हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जात होता. या भागात शेतकऱ्यांचे डाळिंब आणि द्राक्ष हे प्रमुख पीक. कमी पाण्यात खडकाळ परिसरात देखील हे पीक येत असल्याने शेतकऱ्यांची त्याला मोठी पसंती. इथले डाळिंबाची तर परदेशात निर्यात होते. या भागाचे खरे चित्र पालटले ते २०१६ साल नंतर. अतिवृष्टी, बदललेले पर्जन्यमान आणि टेम्भू योजनेच्या पाण्यामुळे पडीक माळरानाचे नंदनवन झाले. एरवी जिल्ह्याच्या पश्चिम भागात घेतले जाणारे ऊसाचे पीक इथेही घेतले जाऊ लागले. साखर कारखाने उभारले गेले आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बदलले. त्यामुळे आता इथला शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागलाय.

भगत बंधूनी स्ट्रॉबेरी ताजी, चवदार,स्वच्छ आणि ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेली विक्रीस नेली. त्यामुळे चांगला दरही भेटला.लालबुंद स्ट्रॉबेरी ती ही खानापूर सारख्या आतापर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात पिकल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.Strawberry farming flourished in the drought belt.

ML/KA/PGB
17 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *