ला-नीना चा प्रभाव ओसरतोय. पुढील वर्षी पाऊसमान घटणार…
मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या तीन वर्षांपासून देशभरात पुरेसे पाऊसमान होत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. सध्या राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. ही स्थिती आगामी काळातील अल निनो ची शक्यता दर्शवते.
भारतीय उपखंडात चांगला पाऊस होण्यास कारणीभूत ठरणारा ला नीना स्थिती आता ओसरत चालली आहे. त्यामुळे येत्या पाऊसकाळात अपुऱ्या पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती असताना भारतात समाधानकारक पाऊस होतो. तर अल निनो स्थिती असताना भारतातील पाऊसमान कमी होते.
पुढील तीन महिने म्हणजे 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे. अमेरिकन संस्था नॅशनल ओशिनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. याच काळात जूनमध्ये मॉन्सून दाखल होतो.
जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. तज्ज्ञांनुसार, अल-नीनो वर्षांमध्ये दुष्काळाची शक्यता 60 टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के व केवळ 10 टक्के सरासरी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
SL/KA/SL
15 Feb. 2023