पहाटेचा शपथविधी पवारांच्या संमतीनेच

 पहाटेचा शपथविधी पवारांच्या संमतीनेच

मुंबई,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :   महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजलेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी पवारांच्या संमतीने झाला होता का? या प्रश्नाला आज अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्णविराम मिळाला आहे. फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे हा शपथविधीचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाल्याचे स्पष्ट केले आहे. टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केला आहे. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” – असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

प्रामाणिकपणे घेतली शपथ

७२ तासांचं सरकार स्थापन झाल्यावर महाविकास आघाडीत शरद पवारांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, याबद्दल विचारलं असता, देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, “अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं काय तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील,” असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

फडणवीस यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर पवारांनी दिलेली प्रतिक्रिया मात्र बुचकळ्यात टाकणारी आहे.

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवारांना विचारले असता ते  म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं,”.

SL/KA/SL

13 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *