पंचगंगेत आढळली पोतंभर आधार कार्डे

 पंचगंगेत आढळली पोतंभर आधार कार्डे

कोल्हापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जिल्ह्यातील इचलकरंजीतल्या पंचगंगा नदी पात्रामध्ये काल पोतंभर आधार कार्डं आढळून आली.राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम राबवताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेषतः ही आधार कार्ड ज्येष्ठ नागरिकांची असून बहुतांशी शहरातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.आधार कार्डे बोगस आहेत का, ती कुणी टाकली याचा तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

पंचगंगा नदीकाठ परिसरात राष्ट्र सेवा दलाच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. स्वच्छता करत असताना नदीपात्रात एक पोतं तरंगतानाआढळून आलं. ते पाण्याबाहेर काढल्यानंतर त्यामध्ये जीर्ण झालेल्या तसेच लॅमिनेशन केलेल्या अनेक आधार कार्डाचा ढीग आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी तातडीनं शिवाजीनगर पोलिसांना दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पथकासह धाव घेतली. चिखलमय पोत्यातून आधार कार्ड बाहेर काढून त्याचा पंचनामा केला. यामध्ये काही कार्डे ओरिजनल असल्याचंही दिसून आलं.
पोलिसांनी याबाबत आढळून आलेल्या आधार कार्डांच्या अनुषंगानं शहानिशा केली.

शहरातील जवाहरनगर, भोने माळ, कोरोची, कबनूर आदी भागातील, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची ही आधार कार्डं असल्याचं आढळून आलं. यापैकी काहींशी संपर्क करण्यात आला. अनेकांनी खरी आधार कार्डे घरीच असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सापडलेली आधार कार्डे ताब्यात घेतली आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

इचलकरंजी शहरात दोन महिन्यांपूर्वी कचऱ्यामध्ये मोठ्या संख्येने रेशन कार्ड आढळून आली होती. या पाठोपाठ आता बोगस आधार कार्डाचे पोते सापडल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती महसूल विभागाला दिली.

ही आधार कार्डे पंचगंगा नदीत कशी आली याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचं आव्हान पोलिसांसह शासकीय यंत्रणेसमोर आहे.

ML/KA/SL

13 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *