जम्मू-काश्मीरमध्ये आढळला या दुर्मिळ धातूचा प्रचंड साठा

 जम्मू-काश्मीरमध्ये आढळला या दुर्मिळ धातूचा प्रचंड साठा

श्रीनगर,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे नंदनवन म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये आता अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातूचा साठा आढळला आहे. या दुर्मिळ धातूचा खजिना भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी उभारी देणारा ठरणार आहे. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडीयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा ५.९ लाख टन साठा सापडला आहे.

लिथिअम धातूचे महत्त्व

  • लिथियम हा कोणत्याही प्रकारची बॅटरी तयार करण्यासाठी लागणारा प्रमुख घटक आहे.
  • लिथियम हा नॉन-फेरस धातू असून तो इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरला जातो.
  • मोबाइल, इलेक्ट्रिक वाहन, सोलार पॅनलमध्ये लिथियम धातूचा वापर अनिवार्य आहे. लिथियम आयन बॅटरीशिवाय या वस्तू तयार होऊ शकत नाही.
  • लिथियमचे अनेक फायदे आहेत. परंतु याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो.
  • सध्या भारत लिथियमसाठी चीन, जपान , दक्षिण कोरिया, इंडोनेशिया , अर्जेंटिना या देशांवर अवलंबून राहावे लागते.
  • भारतात मोठ्या प्रमाणावर लिथियमची आयात केली जाते. २०२० पासून भारत लिथियम आयातीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. यापैकी ८० टक्के भाग चीनकडून मागवला जातो.

आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक लिथिअम

खाण मंत्रालय विभागाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी सांगितलं की, देशात प्रथमच जम्मू काश्मीरच्या रियासी येथे लिथियमचे साठे आढळले आहेत. मोबाइल फोन असो किंवा सोलर पॅनल. प्रत्येक उपकरणांमध्ये लिथियम आयन बॅटरी आवश्यक असते. या बॅटरीसाठी भारत आजवर अन्य देशांवर अवलंबून होता. आता ही आयात कमी होण्याची चिन्हे आहेत.

देशात लिथियमचे साठे सापडल्याने देशातल्या इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्रीला मोठी संजीवनी मिळाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगात सध्या अमेरिका आणि चीन हे देश आघाडीवर आहेत. भारतात वाहनांची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारत आता अमेरिका आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.

10 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *