त्र्यंबकेश्वरच्या तीन पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील वर्षी जून महिन्यात नाशिक जिल्ह्यातील श्री. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर बर्फ साचल्याचे दाखवणारा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. बर्फाचा थर जमा होणे दैवी संकेत, चमत्कार असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र हा बनाव असल्याचे आता उघड झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालात हा बनाव उघड झाल्यानंतर आता तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय उमटले या व्हिडीओचे पडसाद
सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक भाविकांनी आस्थेने दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे धाव घेतली होती. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल शंका उपस्थित होत होत्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन घटनास्थळावर जाऊन पाहणी केली होती. सोशल मिडीयावर या पिंडीवर बर्फ सापडण्याच्या कारणांचा शोध घेणाऱ्या विविध चर्चा देखील झडल्या होत्या. यामागे काही वैज्ञानिक कारण असावे का याचीही चर्चा सुरू होती.
मंदीर प्रशासनाकडून सत्यता तपासणीसाठी समिती
मंदिर प्रशासनानेही या व्हिडिओची पुष्टी केलेली नव्हती. मंदिर प्रशासनातर्फे या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत एक पुजारी तसेच त्याचे दोन सहकारी यांनीच हा बर्फ शिवलिंगावर ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने या तिघांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जादूटोणा विरोधी कायदा लावण्याची अंनिसची मागणी
लोकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या पुजारी तसेच त्याच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संशयितांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे लावण्याची मागणी अंनिसने केली आहे. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही गुन्हा दाखल करण्यास सात महिन्यांचा वेळ का लागला? असाही प्रश्नही अंनिसने उपस्थित केला आहे. अंनिसच्या वतीने जिल्हाधिकारी, नाशिक, त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
SL/KA/SL
9 Feb. 2023