बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया आता वॉटर टॅक्सी सेवा
ठाणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज बेलापूर जेट्टी येथे झाला.
वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईला 55 मिनिटांमध्ये पोचता येणार आहे. मुंबई व परिसरातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले.
बेलापूर जेट्टीच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे, बंदरे व परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, नयनतारा शिपिंग कार्पोरेशनचे कॅप्टन रोहित सिन्हा, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे सोहेल काझानी आदी यावेळी उपस्थित होते.
सेवा नेमकी कशी
वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनानंतर मंत्री भुसे वॉटर टॅक्सीतून बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास केला. वॉटर टॅक्सी सेवेमध्ये एकूण 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात.
ही सेवा नयनतारा शिपिंग कार्पोरेशन व इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसमार्फत चालविण्यात येणार आहे. भुसे म्हणाले की, नवी मुंबई, ठाणे येथील प्रवाशांना मुंबईत रस्ते मार्गाने जाताना खूप वेळ जातो तसेच वाहतूक कोंडी होते. रस्ते मार्गावरील ताण कमी करण्यासाठी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी उपयुक्त ठरणार आहे.
यामुळे प्रवासाच्या वेळेची व इंधनाची बचत होऊन वाहनांचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. या सेवेचे दर कमी करण्यासाठी तसेच सेवेच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच जेट्टीपासून ते इच्छितस्थळी जाण्यासाठी कनेटिव्हिटी निर्माण करण्यावरही भर देण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे या सेवेचे महत्त्व वाढणार आहे.
वॉटर टॅक्सीची सेवेची माहिती जनतेपर्यंत व्हावी व या सेवेला प्रतिसाद मिळावा, यासाठी तसेच महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी संकेतस्थळ तयार करावे.
महाराष्ट्राला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचा वापर करून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर ही शहरे जलमार्गाने जोडण्यावर भर देत आहोत. त्याचप्रमाणे मच्छिमारांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही भुसे यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/SL
7 Feb. 2023