या भारतीय संगीतकाराला तिसऱ्यांदा ग्रॅमी अवॉर्ड
लॉस एंजिलिस,दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे ग्रॅमी पुरस्कार 2023 पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात जगभरातील गायक आणि संगीतकारांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकार रिकी केज यांनी त्यांच्या करिअरमधील तिसरा ग्रॅमी पुरस्कार पटकावला. रिकी यांना त्यांच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराबाबत सोशल मिडीयावर लिहिलेल्या पोस्टमध्ये रिकी केज म्हणतात, – ‘मी माझा तिसरा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे. अत्यंत आनंदी आणि कृतज्ञ, मी हा पुरस्कार भारताला समर्पित करतो.’
रिकी यांना याआधी मिळालेले ग्रॅमी पुरस्कार
2023 पूर्वीही रिकी यांना त्यांच्या म्युझिक अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे. 2015 मध्ये त्यांनी ‘विंड्स ऑफ संसारा’ या अल्बमसाठी पहिल्यांदा हा पुरस्कार आपल्या नावी केला. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी ‘डिव्हाईन टाइड्स’ या म्युझिकल अल्बमसाठी ‘बेस्ट न्यू एज अल्बम’च्या श्रेणीमध्ये स्टीवर्ट कोपलँडसह ग्रॅमी जिंकला. 2023 मध्येही त्यांच्या या अल्बमला पुन्हा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
रिकी केज यांची कामगिरी
रिकी केज यांनी जगभरातील 30 देशांमध्ये एकूण 100 हून अधिक पुरस्कार आपल्या नावी केले आहेत. रिकी यांना त्यांच्या कामासाठी युनायटेड नेशन्स ग्लोबल मानवतावादी कलाकार आणि भारताचे युवा आयकॉन म्हणून नामांकन मिळाले आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या प्रसिद्ध अल्बम ‘डिव्हाईन टाइड्स’मध्ये 9 गाणी आणि आठ म्युझिक व्हिडिओंचा समावेश आहे.
SL/KA/SL
6 Feb. 2023