मुलींच्या रिलेच्या विजेतेपदासह महाराष्ट्राची सोनेरी सांगता
भोपाळ, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेते पदासह महाराष्ट्राने येथील ॲथलेटिक्स शेवटच्या दिवसाची सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला आज महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक तर रिया पाटील तिने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले.
महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, वैष्णवी कातुरे, रिया पाटील व अनुष्का कुंभार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्यांनी बॅटन बदलताना देखील चांगला संयम दाखविला. हे अंतर त्यांनी तीन मिनिटे ५२ सेकंदात पार केले.
इस्लामपूर येथील खेळाडू श्रावणी हिने उंच उडीत १.६३ मीटर्स पर्यंत उडी घेतली. दुस-या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. ती सांगली जिल्ह्यातील खेळाडू असून इस्लामपूर येथे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. “पदक जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता”, असे श्रावणी हिने सांगितले. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक तिला खुणावत आहे.
शेतकऱ्याचे पोर लई हुशार !!
शेतकऱ्यांच्या मुलांकडे देखील खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची क्षमता असते, हे महाराष्ट्राच्या महेश जाधव याने दाखवून दिले. सातारा जिल्ह्यातील अबदरे या खेडेगावात जन्मलेल्या या खेळाडूने मुलांच्या लांब उडी मध्ये रुपेरी कामगिरी केली. त्याने ७.११ मीटर्स पर्यंत उडी मारली. खेलो इंडिया स्पर्धेतील त्याचे हे वैयक्तिक प्रकारात पहिलेच पदक आहे. त्याआधी त्याने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स शर्यतीतही रौप्य पदक मिळवून दिले होते. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर त्याने कनिष्ठ गटात ८० मीटर्स अडथळा शर्यत व लांब उडी या क्रीडा प्रकारात अनेक पदके जिंकली आहेत.
क्रीडा प्राधिकरणाच्या नैपुण्य चाचणीमध्ये त्याने दाखवलेल्या कौशल्यामुळे त्याची मैदानी स्पर्धांसाठी सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षण केंद्रात निवड झाली. तेथे ज्येष्ठ प्रशिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ॲथलेटिक्समधील कारकीर्द सुरू झाली. सांगली येथील प्रबोधिनीचे केंद्र बंद पडल्यानंतर तो पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये महेश पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली आता सराव करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक उंचावण्याचे त्याचे ध्येय आहे आणि त्यासाठी कसून सराव करण्याची त्याची तयारी आहे.
पदकाची खात्री होती- रिया
आठशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राज्यस्तरावर अनेक पदके मिळवली होती तसेच येथील स्पर्धेसाठी चांगला सराव केला होता त्यामुळे पदक मिळवण्याची मला खात्री होती असे या शर्यतीत कांस्यपदक मिळवणाऱ्या रिया पाटील हिने सांगितले. तिने हे अंतर दोन मिनिटे १२.५६ सेकंदात पार केले. या आधी या स्पर्धेत तिने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स रिले शर्यतीत सोनेरी कामगिरी करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. ती कोल्हापूर येथे अभिजीत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.Maharashtra ends in gold with girls’ relay title
ML/KA/PGB
5 Feb. 2023