२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
पुणे दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “संगीतात प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, संगीत चूक आहे की बरोबर, हे ते न शिकलेला माणूस देखील ओळखू शकतो. त्यामुळे आपल्याला किती चांगले येते, हे आपणच ठरवले पाहिजे, आपणच आपले ‘जज’ असले पाहिले आणि त्यानंतरच लोकांसमोर आपली कला सादर केली पाहिजे, अन्यथा तुमच्या चूका तुम्हाला मोठे होऊ देत नाहीत, हा माझा स्वत:चा अनुभव आहे, ” असे मत ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स यांनी व्यक्त केले.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघर येथे गुरुवारी संपन्न झाला. याप्रसंगी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रावण हार्डीकर, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, कलात्मक संचालक समर नखाते, फाउंडेशनचे कोषाध्यक्ष राजेंद्र केळशीकर आणि फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे आदी उपस्थित होते.
यावेळी हार्डीकर यांच्या हस्ते ९४ वर्षीय डॅनियल्स यांना पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ ने गौरविण्यात आले. तर गायिका उषा मंगेशकर यांना भारतीय चित्रपट संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मंगेशकर यांनी डॉ. पटेल यांच्यासोबत काम केलेल्या ‘जैत रे जैत ‘ चित्रपटांबाबतच्या आठवणीना उजाळा देत, पुरस्काराबाबत आभार मानले. तर अभिनेते मनोजकुमार यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी आभार मानलेली ध्वनीचित्रफित देखील दाखविण्यात आली.
उद्घाटन कार्यक्रमात आपल्या स्वागतपर भाषणात डॉ. जब्बार पटेल यांनी महोत्सवात दाखविण्यात येणारे विविध चित्रपट, कार्यशाळा, व्याख्यान याबाबत माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या कॅटलॉग’ चे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रसिद्ध फिल्म एडिटर ए श्रीकर प्रसाद आणि पोलंड येथील ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक ख्रिस्तोफ झानुसी यांचा डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. पटेल यांच्या हस्ते महोत्सवातील ज्युरी डोमनिक लोचर, कीम डोंग होंग, केरी बशेरा, पी शेषाद्री, स्टिग जोर्कमन, जॅकलीन लेंसाव, महेश नारायणन, मरिता हेल्फर यांना सन्मानित करण्यात आले.
यावर्षीची संकल्पना काय
‘सेलिब्रेटींग ७५ इयर्स ऑफ इंडियन सिनेमा ‘ ही यंदा महोत्सवाची संकल्पना आहे. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, गायिका प्रियंका बर्वे यांनी आपल्या सहकलाकारांसह गायन सादर केले. तर अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी सहकलाकारांसोबत नृत्य सादर केले.
ML/KA/SL
3 Feb.2023