कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
नवी मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे.
विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारीला मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली पार पडली यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोलंकी उपस्थित होते.
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी
एकूण 99 मतपेट्या मध्ये मतपत्रिका होत्या. मतमोजणी साठी एकूण 28 टेबले ठेवण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण 35069 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 33450 मते वैध ठरली तर 1619 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 16726 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे – 20683
बाळाराम दत्तात्रेय पाटील – 10997
पहिल्या पसंतीची 20,683 मते मिळवून जिंकून येण्यासाठीचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याणकर यांनी जाहीर केले.